भारतीय बनावटीचे विमान आता महाराष्ट्रात तयार होणार आहे. कॅप्टन अमोल यादव यांच्याशी राज्य सरकारने मॅग्नेटिक महाराष्ट्रात करार केला आहे. ३५ हजार कोटींचा हा करार असून यात अमोल यादव यांना पालघर जिल्ह्यात १५७ एकरची जागा दिली जाणार आहे. विमान बांधणीच्या या उद्योगातून तब्बल १० हजार रोजगार निर्मिती होणार आहे.

मूळचे साताऱ्याचे आणि सध्या मुंबईकर असलेले कॅप्टन अमोल यादव यांनी १९९८ मध्ये ‘थर्स्ट एअरक्राप्ट’ कंपनीच्या माध्यमातून देशातील पहिल्यावहिल्या विमाननिर्मितीचा प्रयत्न सुरू केला. त्यांचा पहिला प्रयत्न फसला. मात्र, त्यामुळे नाउमेद न होता यादव यांनी २००३ मध्ये दुसऱ्या विमानाची निर्मिती सुरू केली. तो प्रकल्पही पूर्णत्वास गेला नाही. अखेर तिसऱ्या प्रयत्नात २००९ मध्ये सहा आसनी विमाननिर्मितीचा प्रयोग यशस्वी ठरला. यादव यांनी आता १९ आसनी विमानाची निर्मिती सुरू केली आहे. या प्रयत्नाची दखल घेत राज्य सरकारने मॅग्नेटिक महाराष्ट्र अंतर्गत यादव यांच्या कंपनीशी करार केला आहे. पालघर येथे विमानबांधणी प्रकल्पासाठी १५७ एकर जागा मिळणार असून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत ही जागा दिली जाईल. या प्रकल्पातून १० हजार रोजगार निर्मिती होणार आहे. या करारासाठी अमोल यादव यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहे.

मुख्यमंत्र्यांनी केला होता पाठपुरावा
वांद्रे- कुर्ला संकुलात भरलेल्या ‘मेक इन इंडिया’ सप्ताहात परवानगी नसतानाही यादव यांनी महत्प्रयासाने आपले विमान प्रदर्शनात मांडले. त्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली आणि या विमानाला मान्यता मिळण्याठी वर्षभर सातत्याने केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. यानंतर विमान वाहतूक संचालनालयाने (डीजीसीए) यादव यांच्या विमानावर मान्यतेची मोहोर उमटवली.