29 May 2020

News Flash

राम मंदिर उभारणीसाठी महाविकास आघाडीचा पाठींबा – हसन मुश्रीफ

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अयोध्या दौर्‍यात महाविकास आघाडीच्या दोन मंत्र्यांचाही सहभाग

हसन मुश्रीफ

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यात महाविकास आघाडीच्या मंत्र्यांचाही सहभाग आहे, असे सांगत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राम मंदिर उभारणीला महाविकास आघाडीचाही पाठींबा असल्याचे शनिवारी स्पष्ट केले. ते कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

मुश्रीफ म्हणाले, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अयोध्येला जाणार असल्याचे अगोदरच घोषीत केले होते. महाविकास आघाडीच्या सरकारचे शंभर दिवस निर्विघ्नपणे पार पडले आहेत. शिवसेनेच्या अजेंड्यावर असलेल्या दोन-तीन योजना मार्गी लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ते अयोध्येला जात आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे राम मंदिराचा प्रश्न मिटला आहे. शिवाय ठाकरे यांच्या अयोध्या भेटीच्या दौर्‍यात महाविकास आघाडीचे दोन मंत्रीही सहभागी होत आहेत.”

करोनामुळे महिला मेळाव्यात दक्षता

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान ‘उमेद’ आणि जिल्हा परिषदेच्यावतीने कोल्हापूर येथे ८ मार्च रोजी राज्यव्यापी जागतिक महिला दिन मेळावा होणार आहे. २५ हजारांहून अधिक महिला यावेळी उपस्थित राहतील, अशी माहिती मुश्रीफ यांनी दिली. या कार्यक्रमासाठी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर आणि खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहणार आहेत.
करोना विषाणूमुळे गर्दी टाळावी असे शासनाच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त कोल्हापूर येथे राज्यातील सर्वात मोठ्या महिलादिनाचा समारंभ होणार आहे. याची कल्पना काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली. यामध्ये आवश्यक ती दक्षता घेऊन कार्यक्रम केला जावा अशी सूचनाही करण्यात आली आहे. त्यामुळे उद्याच्या मेळाव्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. मेळाव्याच्या ठिकाणी ५० स्टॉल व चार वैद्यकीय पथके तैनात केली आहेत. आजारी असणाऱ्या महिलांना मेळाव्यासाठी आणले जाणार नाही, असेही यावेळी मुश्रीफ यांनी सांगितले.

शेतकरी कर्जमाफीवरुन भाजपाला टोला

शेतकरी कर्जमाफीबद्दल बोलताना मुश्रीफ म्हणाले, “फडणवीस सरकारच्या कर्जमाफीचा शेतकऱ्यांना लाभ झाला नाही. मात्र, महाविकास आघाडीच्या महात्मा फुले कर्जमाफी योजनेचा दोन महिन्यांतच शेतकऱ्यांना लाभ होऊ लागला आहे. मी पालकमंत्री असलेल्या अहमदनगर जिल्ह्यात २ हजार ५०० कोटी रुपयांची कर्जमाफी झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ९५ टक्के शेतकरी नियमित कर्जफेड करणारे आहे. त्यांना अनुदान मिळावे ही अपेक्षा आहे. मात्र, हा शेतकरी स्वाभिमानी आहे. तो शासनाला कर्जमाफीबाबत रक्ताने पत्र लिहिणार नाही. त्यामुळे याबाबत कोणी राजकीय स्टंट करून शेतकऱ्यांचा अपमान करू नये, असा टोला त्यांनी भाजपचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष समरजीतराजे घाटगे यांना लगावला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 7, 2020 1:57 pm

Web Title: maha vikas aaghadi supported building of ram temple says hasan mushrif aau 85
Next Stories
1 शासनाच्या सहायक अनुदानकपातीमुळे नगरपालिका अडचणीत
2 कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अधिकारी रणवीर चव्हाण यांचा अपघाती मृत्यू
3 कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीचा रणसंग्राम
Just Now!
X