News Flash

सांगली जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीचा प्रयोग

सांगली जिल्हा परिषदेतील सत्तानाटय़ाचा दुसरा अंक नववर्षांत रंगणार आहे.

दिगंबर शिंदे, सांगली : सांगली जिल्हा परिषदेतील सत्तानाटय़ाचा दुसरा अंक नववर्षांत रंगणार आहे. महाविकास आघाडीला सत्तेसाठी शिवसेनेची मदत घ्यावी लागणार आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीसाठी २ जानेवारी रोजी बैठक बोलावण्यात आली आहे. त्यापूर्वी जिल्हय़ातील १० पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. यासाठी पंचायत समिती सदस्यांची ३० डिसेंबर रोजी बैठक बोलावण्यात आली आहे.

राष्ट्रवादीच्या हाती असलेली सत्ता भाजपने अडीच वर्षांपूर्वी हस्तगत केली. भाजपने सर्वाधिक म्हणजे पुरस्कृतसह २५ जागा जिंकल्या होत्या. भाजपने मित्रपक्षांची मदत घेत ३५ सदस्य एकत्र केले आणि उपाध्यक्ष पद शिवसेना, सभापती पद अपक्ष, रयत विकास आघाडीला देऊन सत्ता गेली अडीच वर्षे टिकवली आहे.

मात्र, राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची संयुक्त महाविकास आघाडीची सत्ता स्थापन होताच जिल्हा परिषदेतही हाच प्रयोग राबविण्याचे मनसुबे आघाडीचे आहेत. नागपूरचे हिवाळी अधिवेशन झाल्यानंतर या प्रयोगाला गती आली आहे. सत्ताबदलासाठी शिराळा येथील आमदार मानसिंगराव नाईक यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली असली तरी अंतिम जुळणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मंत्री जयंत पाटील यांनाच करावी लागणार आहे, तर दुसऱ्या बाजूला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा परिषद हाती राखण्यासाठी मोच्रेबांधणी सुरू केली आहे.

भाजपची सदस्यसंख्या कोकरूड गटातील पोटनिवडणुकीच्या विजयाने २६ झाली आहे. जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या राजीनाम्यामुळे सदस्यसंख्या ५९ झाली असून बहुमतांसाठी भाजपला अवघे चार सदस्य कमी पडतात. वाळवा तालुक्यातील रयत विकास आघाडीचे चार सदस्य असून यामध्ये नायकवडी, महाडिक, सी. बी. पाटील यांना मानणारे सदस्य आहेत. हे गटमंत्री पाटील सांगतील म्हणून बदलतील अशी शक्यता दिसत नाही. तरीही सोमवारी येलूरचे महाडिक बंधू भाजपवासीय झाले. विधानसभा निवडणुकीत भाजपच्या पराभवाला महाडिक यांच्या बंडखोरीने हातभार लावला होता. ही बंडखोरी नजरेआड करीत भाजपने पुन्हा महाडिकांना पक्षात घेऊन जिल्हा परिषदेची सत्ता कायम ठेवण्यासाठी व्यूहरचना केली आहे.

शिवसेनेचे जिल्हा परिषदेत तीन सदस्य आहेत. भाजपला बहुमतासाठी केवळ तीन सदस्यांची गरज असताना ही गरज रयत विकास आघाडीचे चार सदस्य भरून काढणार आहेत. याशिवाय ऐन निवडणुकीच्या हंगामात सेनेत गेलेले अजितराव घोरपडे यांचे दोन सदस्य आहेत. त्यांची जवळीक मंत्री पाटील यांच्याशी असली तरी त्यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. सेनेचे तीन सदस्य असले तरी ते पक्षाचे म्हणण्यापेक्षा आमदार अनिल बाबर यांच्या गटाचे आहेत, असे म्हणणे जास्त योग्य ठरेल.

आमदार बाबर यांचे चिरंजीव सुहास बाबर यांनी उपाध्यक्ष पद गेली अडीच वर्षे सांभाळले आहे. याचबरोबर बाबर यांची राष्ट्रवादीपेक्षा जवळीक भाजपशीच जादा आहे. विधानसभेवेळी त्यांना भाजपनेच जास्त मदत केली. तसेच यापुढील राजकारण त्यांना राष्ट्रवादी, काँग्रेस वगळूनच करावे लागणार आहे. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जर राष्ट्रवादीचा प्रस्ताव स्वीकारून बाबर गटाचे तीन सदस्य महाविकास आघाडीच्या समर्थनार्थ दिले तरी याचा सत्ताबदलात फारसा उपयोग होईल अशीही चिन्हे नाहीत.

सत्ताबदल तूर्तास कठीण

शिवसेना सत्तेत सोबत राहील अशी जुळवाजुळव करण्याची भाजपची तयारी आहे, तर दुसऱ्या बाजूला सेना वगळून सत्ता कायम राखण्यासाठीही भाजपचे प्रयत्न आहेत. कागदावर तरी भाजपची ताकद कमी होण्याची चिन्हे दिसत नाही. तरीही  राजकारणात काहीही घडू शकत असल्याने राजकीय कुरघोडी करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीच्या माध्यमातून होणार हे स्पष्ट आहे. त्यासाठी नियोजन समिती सदस्यत्वाची पाने आता महाविकास आघाडीकडे आहेत. त्याचाही वापर हुकमाची पाने म्हणून केला जाईलच असेही नाही.

ग्रामीण भागाच्या विकासकामात कधीही भाजपने दुजाभाव केलेला नाही, त्यामुळे जिल्हा परिषदेत सेनेचे सदस्य आमच्यासोबतच राहतील असा विश्वास वाटतो.

– मकरंद देशपांडे, प्रदेश सचिव, भाजप

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असल्याने हाच प्रयोग जिल्हय़ाच्या विकासासाठी सांगली जिल्हा परिषदेत राबविण्याचा प्रयत्न आहे. याला अनुकूल प्रतिसाद मिळत असून महाविकास आघाडी जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करेल.

– शरद लाड, राष्ट्रवादी गटनेते, जिल्हा परिषद

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 27, 2019 12:50 am

Web Title: maha vikas aghadi experiments in sangli zilla parishad zws 70
Next Stories
1 पश्चिम विदर्भातील शेतकरी नैराश्याच्या गर्तेत
2 अंगणवाडी कर्मचारी मानधनाविना
3 आदिवासी शेतकरी अनुदानापासून वंचित
Just Now!
X