News Flash

सर्व विरोधकांना एकत्र आणणं हाच शरद पवारांचा अजेंडा- नवाब मलिक

नवाब मलिकांचं भाष्य; मविआ सरकार पाच वर्षे पूर्ण करेल, व्यक्त केला विश्वास

महाविकास आघाडी सरकार पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करेल असा विश्वास नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे.

आता विरोधकांना एकत्र आणणं हाच शरद पवारांचा अजेंडा असणार आहे, असं मत अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी मांडलं आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते. मोजके पक्ष सोबत नाहीत पण हळूहळू त्यांना एकत्र कसं आणता येईल हे ठरवण्यात येईल असंही मलिक यावेळी म्हणाले.

महाविकास आघाडीचं सरकार पाच वर्षे काम करेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. नवाब मलिक म्हणाले, “महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार हे पाच वर्षे काम करणार आहे. आज सरकार जाईल, उद्या जाईल या आशेवर भाजपा दररोज एक एक नवीन नवीन विषय काढत आहे. आज-उद्या सरकार पडेल अशी एक एक तारीख सांगत आहेत. मात्र त्यांची एकही तारीख योग्य ठरत नाही किंवा त्यांची भविष्यवाणी खरी ठरत नाही.”

नवाब मलिक म्हणतात की, “हे सरकार किमान समान कार्यक्रमावर उभारण्यात आलं आहे. सरकारच्या कामावर लोक समाधानी आहेत. हे सरकार पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करेल.”

आणखी वाचा- मोदींविरोधात पवारांचा पॉवरफूल डाव!; भाजपाविरोधी पक्षांची उद्या घेणार बैठक

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशभरात भाजपा विरोधी पक्षांची मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. २०२४ निवडणुकीपूर्वी शरद पवार विरोधकांना एकत्र आणण्याची रणनिती आखत असल्याचं बोललं जात आहे. निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांच्याशी चर्चा केल्यानंतर मंगळवारी दुपारी ४ वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. करोना काळात पहिल्यांदाच विरोधक व्हिडिओ कॉन्फरन्सऐवजी एकत्र बैठकीला उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रमंचच्या माध्यमातून १५ पक्षांचे प्रमुख या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय जनता दल नेते तेजस्वी यादव यांनाही या बैठकीचं आमंत्रण देण्यात आलं आहे. मात्र या बैठकीचं काँग्रेसला बोलवणं नाही.

राष्ट्र मंचच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पहिल्यांदाच भाग घेणार आहेत. राष्ट्र मंचची पायाभरणी २०१८ साली यशवंत सिन्हा यांनी केली होती. सध्या तरी कोणत्याच राजकीय वाटलीची घोषणा राष्ट्र मंचाकडून करण्यात आलेली नाही. मात्र भविष्यात तिसरी आघाडी स्थापन करण्याची शक्यता राजकीय जाणकारांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर ममता बॅनर्जी यांना तिसऱ्या आघाडीचा चेहरा बनवण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं बोललं जात आहे. तसेच शरद पवार तिसऱ्या आघाडीच्या संयोजकपदाची भूमिका पार पाडतील असंही सांगण्यात येत आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2021 4:52 pm

Web Title: maha vikas aghadi government will complete its term of 5 years said nawab malik of ncp vsk 98
Next Stories
1 महाविकास आघाडी अस्थिर करण्यासाठीच मोदी सरकारचा हा प्रयत्न; काँग्रेसचा पलटवार
2 योग दिन विशेष : रामदास आठवलेंनी खास कवितेच्या माध्यमातून दिला संदेश, म्हणाले….
3 हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना-भाजपा युती होऊ शकते”; गिरीश बापट यांचं मोठं विधान
Just Now!
X