करोनाबाधिताला नेण्यासाठी गेलेल्या पथकावर हल्ला करण्याची घटना महाबळेश्वरमध्ये काल रात्री उशिरा घडली. याप्रकरणी आज १२५ व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाबळेश्वर येथील रांजणवाडीमधील वस्तीवर गेल्या दोन दिवसांपासून करोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. गुरुवारी रात्री येथील सात जणांना बाधा झाल्याची माहिती मिळताच प्रशासन खडबडून जागे झाले. एवढे दिवस महाबळेश्वर हद्दीत एकही रुग्ण नसल्यामुळे महाबळेश्वरकर सुरक्षित होते. परंतु सात जणांना बाधा झाल्याची माहिती पसरताच संपूर्ण शहर हादरले. या रुग्णांना नेण्यासाठी मुख्याधिकारी पल्लवी भोरे पाटील यांच्यासह आरोग्य अधिकारी डॉ. अजित शहा व पालिकेचे अधिकारी व कर्मचारी दोन रुग्णवाहिकांसह रांजणवाडी येथे दाखल झाले होते. यावेळी रांजणवाडीमधील रहिवाशांनी रुग्ण नेऊ देण्यास विरोध केला. त्यांच्यावर घरीच उपचार करण्याची मागणी करत जमावाने गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. या वेळी अचानक काहींनी पालिकेच्या पथकावर दगड फेकण्यास सुरुवात केली. त्यामुळे पालिकेच्या कर्मचाऱ्यांची पळापळ झाली. रात्रीच्या अंधारात घडलेल्या या प्रकाराने पालिका कर्मचारी घाबरले. या घटनेत पालिकेच्या वाहनाचे नुकसान झाले. या घटनेची माहिती समजताच वाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांच्यासह पोलीस निरीक्षक बी. ए. कोंडुभैरी पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले.

या घटनेची माहिती गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना मिळताच त्यांनी या घटनेची गंभीर दखल घेत रात्रीच संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. या प्रकरणी कोणाचीही गय केली जाणार नाही. जे दोषी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील. करोनाच्या काळात कार्यरत असलेले विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी, सेवक यांना कोणी त्रास दिला तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार असे देसाई यांनी सांगितले.

आज सकाळी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान नाजनीन रौफ डांगे, नईम मुजावर, वाहीद उस्मान मुजावर, अझर बडाणे यांच्यासह १२५ जणांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती महाबळेश्वर पोलिसांनी दिली. आज पोलिसांनी शहरात संचलन केले. या घटनेमुळे महाबळेश्वर येथे वातावरण तणावपूर्ण पण शांत आहे.