सलग दुसऱ्या दिवशी ४०० मिलिमीटर पाऊस

महाबळेश्वरमधील पावसाचा जोर सलग तिसऱ्या दिवशी कायम असून, गेल्या चोवीस तासांत इथे पुन्हा ४१०.४ मिलिमीटर (साडेसोळा इंच) पावसाची नोंद झाली. गेल्या दोन दिवसांत  ७९९ मिलिमीटर पाऊस पडला आहे. या प्रचंड पावसामुळे परिसरातील अनेक रस्ते खचले आहेत, तर घरांना तडे गेले आहेत. भूस्खलनाच्या घटनाही घडल्या आहेत. येते काही दिवस पर्यटकांसाठी हे पर्यटनस्थळ बंद करण्यात आल्याचे वन विभागाच्या वतीने बुधवारी सांगण्यात आले आहे.

महाबळेश्वर-पाचगणीत गेल्या तीन दिवसांपासून अतिवृष्टी सुरू आहे. या पावसामुळे तालुक्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. ओढेनाल्यांना पूर आले आहेत. रस्ते, वस्त्यांना पाण्याचा वेढा पडला आहे. तालुक्यातील अनेक छोटेमोठे पूल पाण्याखाली गेल्याने दळणवळणही ठप्प झाले आहे. रस्ते खचल्याने अनेक मार्ग बंद करण्यात आले आहेत. पुण्याहून येणाऱ्या मुख्य रस्त्यास वेण्णा जलाशयाजवळ  नदीचे रूप आले होते. यामुळे पुणे ते महाबळेश्वर वाहतूकही ठप्प होती. बुधवार दुपारनंतर पावसाचा जोर ओसरल्यावर ती काही प्रमाणात सुरळीत झाली आहे.

अतिवृष्टीमुळे अनेक भागांत झाडे उन्मळून पडण्याच्या तसेच भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. अनेक घरांना तडे गेले आहेत. बाजारपेठांवरही या पावसाचा परिणाम झाला आहे. सरकारी कार्यालयातील उपस्थितीही नगण्य होती. शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. वेण्णा लेक धरणाच्या सांडव्यावरून मोठय़ा प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. महाबळेश्वरमधील जोरदार पावसामुळे कोयना, कृष्णा, वेण्णा, सावित्री नद्या दुथडी भरून वाहत आहेत. महाबळेश्वर खोऱ्यात झालेल्या जोरदार पावसामुळेच सावित्री नदीला पूर आला असून, या पुरामुळेच महाडजवळील दुर्घटना घडली आहे. धोम, बलकवडी, कण्हेर, उरमोडी आदी धरणांच्या पाणीसाठय़ात मोठी वाढ होत आहे.