03 March 2021

News Flash

दिवाळी सुटीमुळे महाबळेश्वर, पाचगणी हाऊसफुल्ल

पर्यटक आणि वाहनांच्या मोठय़ा गर्दीमुळे या परिसरातील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा

सलग आलेल्या दिवाळी सुटीमुळे महाबळेश्वर पाचगणी हाऊसफुल्ल झाले. दिवाळी सुटीत राज्याबरोबरच परप्रांतीय पर्यटकांनीही मोठी गर्दी केली आहे. पर्यटकांच्या आणि वाहनांच्या मोठय़ा गर्दीमुळे या परिसरातील वाहतूक व्यवस्थाच बिघडून गेली होती. अचानक वाढलेल्या गर्दीने महाबळेश्वर पाचगणीतील लॉजेस चढयादरानेही बुक झाल्याने पर्यटकांना निवाऱ्यासाठी वणवण करावी लागली. वाईचे सर्व लॉजेसही अपुरी पडल्याचे दिसून आले.
दिवाळीनिमित्त आलेल्या सलग सुटीचा पुरेपूर आनंद लुटण्याच्या निमित्ताने महाबळेश्वर पाचगणी या पर्यटनस्थळाला आणि वाईच्या तीर्थस्थळाला यात्रेचे स्वरुप आले होते. महाबळेश्वरातील सर्व पॉइंट्सच्या निसर्गसौंदर्याचा पुरेपूर आनंद लुटला. बाजारपेठेतही मोठी गर्दी होती.वाढलेल्या गुलाबी थंडीमुळे पर्यटकही सुखावले आहेत.पाचगणी टेबललँडला पर्यटकांची गर्दी होती. या ठिकाणी असणाऱ्या गुहेत, तसेच घोडेसफारीचा आनंद पर्यटकांनी घेतला. पाचगणी महाबळेश्वरला जाण्यापूर्वी वाईच्या महागणपतीचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी होती. महाबळेश्वरच्या वेण्णालेकवर बोटींगसाठी पर्यटकांच्या मोठया रांगा लागल्या होत्या.त्यामुळे पहिल्या तीन दिवसातच अकरा लाख रुपयांचा भरणा झाला.क्षेत्र महाबळेश्वर, प्रतापगड ,केट्स ,आर्थरसिट, बॉम्बे पॉईटसह अनेक ठिकाणी पर्यटकांनी फिरून भाजलेले मक्याचे कणीस, स्ट्रॉबेरी, घोडे सवारीसह पर्यटनाचा आनंद घेतला.
या मोठया गर्दीचा फटका सर्वानाच बसला. गुरेघरपासून वेण्णा लेकपर्यंत आणि महाबळेश्वरमध्ये वाहनांच्या मोठमोठाल्या (किमान आठ ते दहा किमी ) रांगा लागल्या होत्या.यामुळे सर्वांनाच गाडीतच आपला वेळ घालवावा लागला. या सुटीत किमान पंचवीस हजारापेक्षा पर्यटकांनी हजेरी लावल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. अनेक वर्षांनंतर एवढी मोठी गर्दी झाल्याची स्थानिकांमध्ये चर्चा आहे. रात्रीची निवासव्यवस्थाही कोलमडून गेली. महाबळेश्वर पाचगणीतील लॉजेसचे एकदम चढयाभावात बुकींग झाले. फुल झाल्यावर वाईला लॉजसाठी पर्यटकांची गर्दी झाली. वाईतील सर्व लॉज, फार्म हाऊसही फुल झाले होते. महाबळेश्वर पाचगणी आणि वाईतील लॉजच्या चढत्या किमतीमुळे पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली. दिवाळी सुटीचा आनंद घेण्यासाठी आणि अडचणींवर मात करत पर्यटकांनी या परिसरात निसर्गाचा आनंद लुटला. यात महाराष्ट्राबरोबरच गुजरात, कर्नाटक आदी सीमावर्ती भागातील परप्रांतीय पर्यटक मोठया संख्येने सहभागी झाले होते. गर्दी आणि वाहतुकीची कोलमडलेली व्यवस्था यामुळे अनेकांनी थोडावेळ थांबून काढता पाय घेतला.
महाबळेश्वरमधील सर्वच ए टीएम सेंटरमध्ये खडखडाट
महाबळेश्वरमध्ये स्टेट बँक, महाराष्ट्र बँक, युनियन बँक या राष्ट्रीयीकृत बँकांची एटीएमसेंटर्स आहेत. या व्यतिरिक्त येथे एच.डी.एफ.सी. बँक व एक्सिस बँकांचीही ए .टी. एम.सेंटर्स अशी एकूण पाच एटीएम.सेंटर्स आहेत. मात्र आज रविवारी पहाटेपासूनच या सर्वच्या सर्व बँकांच्या ए .टी. एम.सेंटर्स मध्ये खडखडाट झाल्याचे आढळून आल्याने येथे दिवाळी सुटीसाठी आलेल्या अनेक पर्यटकांची फारच गरसोय व कुचंबणा झाली. आपल्या मुला बाळांसमावेत,परिवारासमवेत फिरायला आलेल्या पर्यटकांना कोणत्याच ए .टी. एम.सेंटर्स मधून पसे न मिळाल्याने बिकट प्रसंगांना सामोरे जावे लागले. खात्यात भरपूर पसे असूनही येथील बँकांच्या ए .टी. एम .सेंटर मधून पसे न मिळाल्याने सर्व ट्रिप वाया गेली, सर्वच ए .टी. एम.सेंटर्समधून जाउन आलो, परिवारासह पायपीट झाली, मात्र एकही सेन्टर सुरु नव्हते,अशी पर्यटक तक्रार करत होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 16, 2015 3:15 am

Web Title: mahabaleshwar panchgani house full due to diwali holiday
टॅग : Panchgani
Next Stories
1 साहित्य संमेलनात २२ नोव्हेंबर रोजी पुरस्कारांचे वितरण
2 ‘कोमसाप’च्या पदांसाठी ‘खो खो’ सुरूच
3 वाचाळवीरांचा बंदोबस्त आवश्यक!
Just Now!
X