रायगडमधील महाड येथे पाच मजली रहिवसी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा दहावर पोहोचला आहे. सोमवारी संध्याकाळी सात वाजता ही दुर्घटना घडली. घटना घडतेवेळी याच्या ढिगाऱ्याखाली सुमारे ८० जण अडकल्याचे सांगण्यात येत होते. यांपैकी आत्तापर्यंत २१ जणांना बाहेर काढण्यात यश आले असून यांपैकी १३ जणांचा मृत्यू झाला आहे.

या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांमध्ये सय्यद अमित समीर (वय ४५), नविद झमाने (वय ३५), नौसिन नदीम बांगी (वय ३०), आयेशा नदीम बांग (वय ७), रुकैय्या नदीम बांगी (वय २), आदी हाशिम शेखनाग (वय १४), इसमत हाशिम शेखनाग (वय ३५), रोशनबीबी दाऊदखान देशमुख (वय ५६), फातिमा अन्सारी (वय ४३), अल्लतमस बल्लारी (वय २६), शौकत आदम अलसूलकर( वय ५०), मतीम मुकादम (वय १७), फातिमा शौकत असुलकर (वय ६०) यांचा समावेश आहे.

दरम्यान, या दुर्घटनेत बचावलेल्या मोहम्मद बांगी या सहा वर्षीय मुलाची आई नौसिन नदीम बांगी आणि आयेशा व रूकैया या दोघी बहिणी असे कुटुंबातील तिघेजण मात्र या दुर्घटनेत मृत्यू पावले आहेत.

दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत

तारीक गार्डन इमारत दुर्घटनेत मरण पावलेल्या प्रत्येक मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची शासकीय मदत देण्याची घोषणा मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज महाडमध्ये केली. या दुर्घटनेत या इमारतीतील कुटुंबियांनी आपले सर्वस्व गमावले आहे, त्यामुळे या कुटुंबांना आणखी अर्थिक मदत करण्याबाबत उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतला जाईल, असेही वडेट्टीवार यावेळी म्हणाले.