दलित जातींना देशातील जातीय विषमतेमुळे कायमच अपमान सहन करावा लागत असला तरी प्रत्यक्षात देशातील अनेक दलित जातींचा इतिहास हा युद्ध तसंच लढायांमधील शौर्याच्या कामगिरींनी सजलेला आहे. भिमा-कोरेगाव येथील विजयस्तंभाला ज्याप्रमाणे बौद्ध समाज आपल्या पराक्रमाचे प्रतीक मानतो, त्याप्रमाणे रायगडमधल्या महाड येथील चांभारखिंड तसेच चांभारगड म्हणजे चर्मकार समाजाच्या शौर्याचे प्रतीक असून त्यापासून सामाजिक लढाईला प्रेरणा घेण्याच्या उद्देशाने रविवारी ३ फेब्रुवारी रोजी चर्मकार समाजातील हजारो बांधव सकाळी चांभारखिड येथे एकत्र येणार आहेत. त्यासाठी “चला चांभारगडावर” अशी घोषणा चर्मकार बांधव देत असून त्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर केला जात आहे.

याविषयी अधिक माहिती देताना चांभारगड संवर्धन समितीचे निमंत्रक शांताराम कारंडे यांनी सांगितले की, “रायगडमधील महाडच्या चांभारखिंड येथे शेकडो वर्षांपासून चर्मकार समाजातील बांधव राहत आहेत. इथे येऊ घातलेल्या शत्रूंना पहिल्यांदा सामोरे जावे लागायचे ते चर्मकार योद्ध्यांशीच. चर्मकार योद्ध्यांच्या पराक्रमाची साक्ष म्हणूनच या परिसराला चांभारखिंड असे नाव पडले. आजही या भागातील ग्रामपंचायतीचे नाव चांभारखिंड ग्रामपंचायत असेच आहे. चर्मकार समाजाच्या योद्ध्यांचा सन्मान करण्यासाठीच पूर्वी ज्याला महेंद्रगड असे ओळखले जायचे, त्याचे नामकरण शिवकाळातच चांभारगड असे केले. चर्मकार समाजाचा हा इतिहास लोकसंस्कृतीतून आजवर टिकला असला तरी एखाद-दुसरा अपवाद वगळता त्याची इतिहासलेखनात पुरेशी दखल घेतली गेलेली नाही.”

Ulta-Chashma
उलटा चष्मा: लोक‘शाही’ लग्न 
lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची अखेरची धडपड
Benjamin Basumatary sleeping on cash
नोटांच्या ढिगाऱ्यावर झोपलेल्या नेत्याचा फोटो व्हायरल; भाजपाच्या मित्रपक्षाने म्हटले…
Priyadarshni Rahul
हुंड्याविरोधात असाही लढा! लग्न मोडल्यानंतर तिने घडवली ‘अशी’ अद्दल, कायद्याचा अभ्यास अन् १४ वर्षे लढा!
चांभारगड

“महाराष्ट्रात शेकडो गड-किल्ले असले तरी चांभारगड हा असा एकमेव गड आहे, ज्याचे नाव एखाद्या जातीवरून देण्यात आलेले आहे. ही बाब चर्मकार समाजासाठी निश्चितच अभिमानास्पद असून आमच्या या गौरवशाली इतिहासापासून प्रेरणा घेण्यासाठी मुंबई, ठाणे, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, बीड येथून हजारो चर्मकार बांधव ३ फेब्रुवारी रोजी चांभारगडावर मानवंदना देण्यासाठी एकत्र येणार आहेत”, असेही चांभारगड संवर्धन समितीचे निमंत्रक शांताराम कारंडे यांनी सांगितले.

चांभारखिड परिसरात आजही चर्मकार समाजातील ५०० कुटुंबे राहत असून त्यांचा इथला स्थानिक इतिहास जाणून घेऊन तो ग्रंथरूपाने प्रकाशित करण्याचाही आम्ही प्रयत्न करणार आहोत. महाडमध्येच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळे दलितांसाठी खुले करण्यासाठी मोठा लढा दिला. त्याच महाडमध्ये दलितांच्या इतिहासातील एक सोनेरी पान दडलेले आहे, ते सोनेरी पान सर्वांसमोर यावे, याच एकमेव हेतूने चांभारगड संवर्धन समिती काम करणार असल्याचंही शांताराम कारंडे यांनी सांगितले.

दि. ३ फेब्रुवारीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे..

१. चांभारखिंड, महाड येथे सकाळी १० वा. चर्मकार बांधव जमा होणार.

२. सकाळी ११ वा. गड चढायला सुरूवात करून गडावर भगवा फडकवून चर्मकार योद्ध्यांना मानवंदना देणार.

३. गड फिरून तिथे स्वच्छता मोहीम राबवणार. तसेच वृक्षारोपण करणार.

४. गडाच्या परिसरात राहणाऱ्या चर्मकार समाजाच्या ५०० कुटुंबांच्या गाठीभेटी घेऊन समाजाचा इतिहास संकलित करण्याचा प्रयत्न करणार.

५. चांभारगड संवर्धन समितीची औपचारिक स्थापना करणार.

६. संध्याकाळी महाड येथील चवदार तळ्याला भेट देऊन समारोप.