राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेव जानकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल दीड तास चर्चा झाली. रासप हा भाजपाचा मित्र पक्ष आहे. असं असूनही जानकर यांनी पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. महादेव जानकर हे देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री होते. पुण्यातील मांजरी या ठिकाणी असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटमध्ये शरद पवार आणि महादेव जानकर यांची भेट झाली.

काय म्हणाले जानकर?

आमचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या साखर कारखान्याच्या परवान्यासंदर्भात मी शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीनंतर कारखान्याच्या परवान्याचे कामही झाले आहे. तसंच मी शरद पवार आणि अजित पवार यांना भेटणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनाही कळवलं आहे असं जानकर यांनी म्हटलं आहे. काही लोक या भेटीचा वेगळा अर्थ काढत आहेत. मात्र असं करणं म्हणजे पराचा कावळा करण्यासारखं आहे. आमची भेट काही वेळापुरतीच होती त्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. आम्ही एनडीएत आहोत असंही जानकर यांनी स्पष्ट केलं.

गेल्या काही दिवसांपासून महादेव जानकर नाराज आहेत अशा चर्चांना उधाण आलं होतं. त्या पार्श्वभूमीवर महादेव जानकर यांनी शरद पवारांची घेतलेली भेट ही अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली. अशात या भेटीचा राजकीय अर्थ काढला जाऊ नये हे महादेव जानकर यांनी स्पष्ट केलं आहे. नवरात्राच्या वेळी एकनाथ खडसे यांनी भाजपात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. त्यावेळी एकनाथ खडसे यांनीही शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता भाजपाचा मित्र पक्ष असलेल्या रासपच्या अध्यक्षांनी म्हणजेच महादेव जानकर यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं.