ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आणि मालवण येथील वृत्तपत्र विक्रेते महादजी कृष्णाजी शिंदे-यळगुडकर (८८) यांचे गुरुवारी मध्यरात्री निधन झाले. मालवण चिवला बीच येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत अन्त्यसंस्कार करण्यात आले. शिंदे यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्य़ातील यळगुड येथे १ मे १९२७ रोजी झाला. कोल्हापूर येथे वृत्तपत्र एजंट म्हणून काम केल्यानंतर ते १९६३ मध्ये मालवण कुंभारमाठ येथे वास्तव्यास आले. गणपोले मायनिंग कॉर्पोरेशनमध्ये सुपरवायझर म्हणून ४० वर्षे नोकरी केली. कोल्हापूर येथे सैनिकी नोकरीही पत्करली होती. मात्र त्याच वेळी देशाच्या स्वातंत्र्य संग्रमाची चळवळ सुरू होती. त्यांनी देशहिताच्या लढय़ात उडी घेतली. स्वातंत्र्यानंतर सरकारदरबारी स्वातंत्र्यसैनिक म्हणून नोंद केली नाही किंवा पेन्शनच मागणीही केली नाही. सरकारचा एकही पैसा घेणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले होते. काही महिन्यांपूर्वी वृत्तपत्र टाकत असतानाच अपघात होऊन गंभीर जखमी झाले होते. अनेक दिवस घरातच उपचार घेत होते. त्यांचा वृत्तपत्र स्टॉल मुलगा राजेंद्र शिंदे चालवत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 7, 2015 5:46 am