एकीकडे शिवसेनेने युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जनआशीर्वाद यात्रा सुरू केली आहे. त्यापार्श्वभूमीवर भाजपानेही मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी महाजनादेश यात्रा काढण्याचे निश्चित केले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महाजनादेश यात्रा निघणार आहे.

संपूर्ण ऑगस्ट महिन्यात राज्यभर भाजपाची महाजनादेश यात्रा निघणार आहे. 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान राज्यभरात भाजपाची महाजनादेश यात्रा निघेल. तर दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही महाजनादेश यात्रा काढणार काढणार आहेत. 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यानच्या या यात्रेत मुख्यमंत्री राज्यातील विविध भागांना भेट देतील. तसेच सरकारने राबवलेल्या योजनांची माहितीही मुख्यमंत्री मतदारांना देणार आहेत.

भाजपाकडून एकीकडे संघटनात्मक पातळीवर इतर पक्षातील नेत्यांचे पक्षप्रवेश, बैठका, कार्यकर्त्यांशी संवाद या माध्यमातून पक्षाचा पाया भक्कम करण्याचे काम सुरू आहे. तर, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आकर्षित करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आखाड्यात उतरणार आहेत.  विधानसभेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. लोकसभा निवडणुकीची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीतही करण्यासाठी भाजपाने कंबर कसल्याचं दिसतंय. शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांकडून वेगवेगळ्या यात्रांचं आयोजन करण्यात आलं असलं तरीही आगामी विधानसभेसाठी महाराष्ट्रात भाजपा- शिवसेना युती होणार असल्याचे जवळपास स्पष्ट आहे.