मागील पाच वर्षांत सरकारने खूप मोठी विकास कामे केली आहेत. ही कामे जनतेसमोर मांडण्यासाठी महाजनादेश यात्रा काढण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाई येथे दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा आज वाई येथे आली असताना मुख्यमंत्री बोलत होते. या वेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, माजी आमदार मदन भोसले, नरेंद्र पाटील, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आदी  उपस्थित होते.

मागील पंधरा वर्षांत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारने केलेली कामे व या पाच वर्षांत भाजप सेनेच्या सारकारने केलेल्या कामाचे मूल्यमापन करावे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, जनतेने परिवर्तन करून भाजपा-सेना सरकारला काम करण्याची दिलेली संधी यातून राज्याचा खूप मोठय़ा प्रमाणात विकास झाला आहे. या पाच वर्षांत काय काम केले, हे जनतेसमोर परिवर्तनाच्या माध्यमातून मांडण्यात येत आहे. आमच्या पाच वर्षे कारकीर्दीमध्ये राज्यातील सगळी कामे संपली प्रश्न संपले असे नाही. मात्र सरकारने या पाच वर्षांत आरोग्य, रोजगार, शेतकरी, कामकरी कष्टकरी भूमिहीन शेतमजूर उद्योगपती युवकांसाठी घराच्या अनेक संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना,राज्य मार्ग, राष्ट्रीय मार्ग सरकारने बांधले. गावागावात शहरात विकासकामे आपल्यापर्यंत पोहोचवून संवाद साधून जनादेश घेऊ न जाण्यासाठी राज्यात महाजनादेश यात्रा घेऊ न जात आहे. पाच वर्षांत केलेल्या विकासकामांवर पुन्हा भाजप सेनेचे सरकार येणार आहे. वाई मतदार संघातील विकासकामांना निधी कमी पडू  देणार नाही, असे त्यांनी सांगितले.

माजी आमदार मदन भोसले यांनी प्रास्ताविक करताना वाईच्या विकासकामाला मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या मदतीबाबत आभार मानले व मुख्यमंत्र्यांच्या कामाचे कौतुक केले.