मुंबईहून कोल्हापूरकडे येणारी महालक्ष्मी एक्सप्रेस बदलापूर येथे पुराच्या पाण्यात अडकून पडल्याचे समजल्यानंतर कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यतील प्रवाशांचे नातेवाईक आणि मित्र परिवाराचा जीव दिवसभर टांगणीला लागला होता. प्रवाशांच्या सुटकेची बातमी कळेपर्यंत हुरहुर, काळजी,भीती अशा भावनांचा कल्लोळ शनिवारी सकाळी पश्चिम महाराष्ट्रात दाटला होता.

मुंबईहून कोल्हापूरकडे महालक्ष्मी एक्सप्रेसने दररोज अनेक प्रवासी प्रवास करत असतात. रात्री निघून सकाळी आपल्या शहरात वेळेवर पोहोचणारी ही एक्सप्रेस पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना मोठा आधार आहे. काल रात्री निघालेल्या महालक्ष्मी एक्सप्रेसमधील प्रवाशांना मात्र एका वेगळ्याच भीती आणि थराराच्या अनुभवाला सामोरे जावे लागले.

वांगणी—बदलापूर येथे महालक्ष्मी एक्सप्रेस पोहोचल्यावर ती तेथेच थांबवण्याचा निर्णय घेतला गेला. याची माहिती आज  सकाळी प्रवाशांनी नातेवाइकांना कळवली. त्यामुळे सकाळपासूनच कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यतील नातेवाइकांत काळजीचे वातावरण दाटले होते. आपल्या कुटुंबातील सदस्य या संकटातून सुखरूप बाहेर पडावेत अशी प्रार्थना केली गेली. याच वेळी रेल्वे, पोलीस, जिल्हा प्रशासन यांच्याकडे चौकशी करून मदतीची विनंती केली जात होती.

कोल्हापूर प्रशासन दक्ष

कोल्हापूर जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, पोलीस प्रशासन, रेल्वे प्रशासन यांनीही या घटनेची गंभीरतेने दखल घेतली. समाजमाध्यम, आकाशवाणी, एफएम रेडिओ याच्या माध्यमातून महालक्ष्मी एक्सप्रेसमधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत, अशी खात्री दिली गेली. याच वेळी प्रवाशांची सुटका करण्यासाठी कशाप्रकारे मदत केली जात आहे, याची वेळोवेळी माहिती देण्यात आली. यामुळे कुटुंबीयांना धीर मिळाला.

ग्रामस्थ व बचाव पथकाचा आधार— जाजू

या संदर्भात काही प्रवाशांशी संपर्क साधला असता त्यांनी अशाप्रकारच्या संकटाला प्रथमच सामोरे जावे लागत असल्याचे सांगितले. इचलकरंजी येथील विद्यार्थी अंशुल आनंद जाजू हा मुंबईतील सोमय्या वैद्यकीय महाविद्यालयात शिकतो. तो महालक्ष्मी एक्सप्रेसने प्रवास करीत होता. त्याने सांगितले,की रात्री प्रवासावेळी मी झोपी गेलो होतो. पहाटे सहा वाजता जाग आली, तेव्हा सहकाऱ्यांना  कोणत्या ठिकाणी पोहोचलो आहे अशी विचारणा केली,  तेंव्हा त्यांनी मध्यरात्रीपासून बदलापूर येथेच रेल्वे अडकून पडली असल्याचे सांगितले. यामुळे मी काळजीत सापडलो. सकाळी आठच्या सुमारास स्थानिक ग्रामस्थांनी मदतकार्य सुरू केले. दहा वाजता बचाव पथक दाखल झाले. त्यांनी बोटीतून प्रथम महिला, ज्येष्ठ नागरिक व लहान मुले यांना सुरक्षितपणे नेले. तर तरुण व प्रौढांना दोरखंडाने सुरक्षितस्थळी हलवले. या ठिकाणी चहापाण्याची सोय केली होती. तेथून बदलापूर व कल्याण अशा ठिकाणी जाण्यासाठी बसेसचीही सोय केली होती. भीती, काळजीचे वातावरण असले तरी ग्रामस्थ व बचाव पथकाने केलेल्या मदतीमुळे सर्व प्रवाशांना मोठा आधार मिळाला, असे सांगून अंशुलने या सर्वाचे आभारही व्यक्त केले.