कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराच्या गाभाऱ्यात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने बसवलेले चार सीसीटीव्ही कॅमेरे पुजाऱ्यांनी परस्पर बंद केल्याची माहिती समोर आली आहे.  या कारणामुळेच पुन्हा एकदा पुजारी आणि समिती आमनेसामने आले आहेत. प. महाराष्ट्र देवस्थान समितीने पुजाऱ्यांच्या या निर्णयावर आक्षेप घेतला. इतकेच नाही तर कॅमेरे बंद केल्याने फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याचेही शुक्रवारी झालेल्या संयुक्त बैठकीत स्पष्ट केले. या बैठकीत जोरदार खडाजंगी झाल्याचे समजताच पुजारी हटाव संघर्ष समितीने या पुजाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. या मागणीमुळे वातावरण काही काळ तणावाचे झाले होते. पोलिसांनी हस्तक्षेप करत या बैठकीतून पुजाऱ्यांना बाहेर काढले.

महालक्ष्मी देवीच्या थेट प्रक्षेपणासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने गुरूवारी दुपारी मंदिराच्या गाभाऱ्यात चार सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. मात्र संध्याकाळीच हे कॅमेरे पुजाऱ्यांनी बंद केले. इतकेच नाही तर शुक्रवारी सकाळी हे कॅमेरे कापडात बांधून ठेवले होते. या प्रकाराबाबत समितीने तातडीने पुजाऱ्यांच्या प्रतिनिधींसह कार्यालयात बैठक बोलावली. शुक्रवारी बैठक सुरू होताच समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी पुजाऱ्यांना यासंदर्भात जाब विचारला. या बैठकीत पुजाऱ्यांच्या वतीने बाबूराव ठाणेकर, माधव मुनीश्वर, केदार मुनीश्वर, अनिल कुलकर्णी आणि गजानन मुनीश्वर या सगळ्यांनी समितीला निवेदन दिले. समितीने बळजबरीने कॅमेरे लावून पुजाऱ्यांच्या अधिकारावर गदा आणली आहे तेव्हा हे कॅमेरे त्वरित काढून घ्यावेत. तसे न झाल्यास समितीविरोधात कायदेशीर कारवाई करावी लागेल असा इशारा पुजाऱ्यांनी यावेळी दिला.

पुजाऱ्यांच्या वतीने देण्यात आलेले निवेदन पाहताच समितीचे सदस्य संतापले. पुजाऱ्यांनी सीसीटीव्ही कॅमेरांशी छेडछाड केली असा आरोप समितीचे अध्यक्ष महेश जाधव, खजिनदार वैशाली क्षीरसागर, सदस्य शिवाजी जाधव, संगीता खाडे, सुभाष वोरा या सगळ्यांनी घेतला. इतकेच नाही तर गाभाऱ्याच्या चाव्या आमच्या हाती आहेत हे विसरू नका असा इशाराही दिला. तरीही कॅमेरे हटवाच असा आक्रमक पवित्रा पुजाऱ्यांनी घेतला. तर कॅमेरे सुरूच राहतील अशी भूमिका समितीने घेतली. त्यामुळे वाद झाला अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करून पुजाऱ्यांना बाहेर काढले.