सरासरी १५० मिली तुफानी कोसळणारा पाऊस, धरण -नद्यांच्या पाण्याच्या पातळीत झालेली वाढ, पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे होऊ लागलेली वाटचाल यामुळे कोल्हापूर जिल्ह्यावर यंदा महापूराचे संकट घोंघावताना दिसत आहे. एकीकडे करोनाचा वाढता संसर्ग रोखण्याचे आव्हान बिकट बनले असतानाच त्यात आता मोजक्या यंत्रणेनिशी महापूर संकटाचा मुकाबला करावा लागणार असल्याने या दोन्ही आव्हानांना सामोरे जाताना प्रशासनाचा कस लागणार आहे.

या पार्श्वभूमीवर  जिल्हाधिकारी डॉक्टर दौलत देसाई यांच्या उपस्थितीत महापुराचा सामना करण्यासाठी नियोजनाची बैठक आयोजित करण्यात आली होती.

कोल्हापूर जिल्ह्याला मागीलवर्षी ऑगस्टमध्ये महापुराचा जबर तडाखा बसून मोठी हानी झाली होती. या संकटातून जिल्हा सावरत असतानाच मार्च महिन्यापासून जिल्ह्यात करोनाचे रुग्ण आढळू लागले. प्रत्येक महिन्याला यामध्ये झपाट्याने वाढ होत गेली. त्यात आता जिल्ह्यात करोना रुग्णांना उपचारासाठी दाखल करून घेतले जात नसल्याने सर्वपक्षीय कृती समितीला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागले आहे.

एकीकडे करोनाचे संकट गंभीर बनत चालेले असताना आता महापुराची परिस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात जून मध्ये दमदार पावसाला सुरुवात झाली. मध्यंतरी पावसाने दडी मारल्याने तरारून आलेली पिकं हातची जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. अशा मोक्याच्या वेळी पावसाचे दमदार पुनरागमन  शेतकऱ्यांना सुखावणारे असले तरी प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. पावसाची गती पाहता पंचगंगा नदी आज रात्री इशारा पातळी ओलांडून धोका पातळीकडे जाण्याची चिन्हे आहेत.

या पार्श्वभूमीवर गावा-गावात दवंडी देऊन नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला जात आहे. ही गंभीर परिस्थिती ओळखून जिल्हा प्रशासन दक्ष झाले आहे. प्रत्येक गावात तलाठी, ग्रामसेवकासह सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत मुख्यालय सोडल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. महापुराचा अधिक धोका असलेल्या करवीर तालुक्यातील चिखली व आंबेगाव येथील गावकऱ्यांना स्थलांतरित होण्याच्या सूचना केल्या आहेत. महापुराचा धोका निर्माण निर्माण झाल्यास बचावासाठी एनडीआरएफची पथके अगोदरच तैनात झाली आहेत. महापुरातील लोकांना बाहेर काढण्यासाठी लाईफ जॅकेटचा वापर करण्याची सज्जता ठेवली आहे. एकंदरीत प्रशासनाने महापुराला सामोरे जाण्याची तयारी केली आहे.

मंत्री – अधिकाऱ्यांची कसोटी

महापुरामुळे लोकांना स्थलांतरित करावे लागणार असून त्यासाठी लागणारी जागा व वाढत्या करोना रुग्णांसाठी तसेच विलगीकरण केंद्रातील लोकांसाठी आवश्यक असणारी जागा उपलब्ध करून देण्यासाठी  जिल्ह्यातील तिन्ही मंत्री तसेच अधिकाऱ्यांसमोर नियोजन करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील करोना रुग्ण संख्या आठ हजारावर गेल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी बुधवारी संपर्क साधला असता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी करोना परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोल्हापूरला येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आरोग्य मंत्र्यांच्या फेरीनंतर तरी कोल्हापूरच्या करोना स्थितीत सुधारणा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.