महाराष्ट्रात १२३० नवे करोना रुग्ण आढळले आहेत. तर करोनाची लागण झाल्याने २४ तासात ३६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या २३ हजार ४०१ इतकी झाली आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रात करोनाची लागण होऊन ८६८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आज महाराष्ट्रात ५८७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आत्तापर्यंत महाराष्ट्रातल्या ४ हजार ७८६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. २४ तासांमध्ये ज्या ३६ रुग्णांचा मृत्यू झाला त्यामध्ये २० जण मुंबईतले, ५ सोलापुरातले, ३ पुण्यातले, २ ठाण्यातले, १ अमरावतीत, १ औरंगाबादमध्ये, १ नांदेडमध्ये, १ रत्नागिरीत, १ वर्ध्यातला रुग्ण आहे. उत्तर प्रदेशातील एका रुग्णाचा मृत्यू मुंबईत झाला आहे.

ज्या ३६ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला त्यामध्ये २३ पुरुष आणि १३ महिला रुग्णांचा समावेश आहे. यापैकी १७ जणांचे वय ६० वर्षांपेक्षा अधिक होते. तर १६ जणांचे वय हे ४० ते ५९ या वयोगटातले होते. तर तिघांचे वय ४० पेक्षा कमी होते. ३६ मृत रुग्णांपैकी २७ जणांना मधुमेह, हृदय विकार, उच्च रक्तदाब यांसारखे गंभीर आजार होते. महाराष्ट्रात आता करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ८६८ इतकी झाली आहे.

आत्तापर्यंत २ लाख १८ हजार ९१४ चाचण्या करण्यात आल्या, ज्यापैकी १ लाख ९३ हजार ४५७ चाचण्या निगेटिव्ह आहेत तर २३ हजार ४०१ चाचण्या पॉझिटिव्ह आहेत. सध्याच्या घडीला राज्यात २ लाख ४८ हजार ३०१ होम क्वारंटाइन आहेत तर १५ हजार १९२ जणांना संस्थात्मक क्वारंटाइन करण्यात आलं आहे.

मुंबईत आढळले ७९१ नवे रुग्ण

दरम्यान आज मुंबईत ७९१ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर २० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतल्या करोनाग्रस्तांची संख्या १४ हजार ३५५ इतकी झाली आहे. आत्तापर्यंत ३ हजार ११० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत आत्तापर्यंत करोनाची लागण होऊन ५२८ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबई महापालिकेने ही माहिती दिली आहे.