बीड जिल्ह्यातील धानोऱ्याजवळ खासगी बसच्या अपघातात ९ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी पहाटे घडली. या अपघातात १२ जण जखमी झाले असून चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

खासगी ट्रॅव्हल्सची बस पुण्याहून लातूरला निघाली होती. रविवारी पहाटे आष्टीच्या धानोऱ्याजवळ चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस एका वळणावर रस्त्यावरुन खाली उतरली. सुमारे १०० मीटर अंतरापर्यंत गेल्यावर बस उलटली आणि या अपघातात ९ प्रवाशांचा मृत्यू झाला असून १२ प्रवासी जखमी झाले आहेत.  जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मृतांमध्ये दोन महिला आणि सात पुरुषांचा समावेश आहे. बसचालक वेगाने बस चालवत होता असेही प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे. दरम्यान, या अपघातामुळे खासगी बसमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.