करोनाच्या दुसऱ्या लाटेतून राज्य सावरत असतानाच आता एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. राज्यातल्या अहमदनगर जिल्ह्यातल्या नऊ हजारांहून अधिक लहान मुलांना करोनाची लागण झाली आहे.

याविषयी एएनआयने ट्विट करत माहिती दिली आहे. मे महिन्यात अहमदनगरमधल्या नऊ हजार ९२८ अल्पवयीन मुलांना करोनाची लागण झाली आहे. रुग्ण बाधित होण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याने लहान मुलांमध्येही करोनाची लागण होण्याचं प्रमाण वाढलं आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक सुनील पोखर्णा यांनी दिली. ते म्हणाले, गेल्या महिन्यात म्हणजे एप्रिलमध्ये सात हजार ७६० लहान मुलांना करोनाची लागण झाली होती. पण कोणाचीही प्रकृती गंभीर असल्याचं अद्याप आढळून आलेलं नाही.

राज्य सरकारच्या उपाययोजना

करोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये बालकांना अधिक धोका असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणांना अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने कठोर पावले उचलली आहेत. पूर्वतयारी म्हणून यासाठी बालरोगतज्ज्ञांचे करोना कृतिदल तयार करण्यात आले आहे.

आणखी वाचा- एक ते दहा वयोगटातील बालके बाधित होण्याचे प्रमाण ३.४५ टक्के

दहा बालरोगतज्ज्ञांचा समावेश असलेल्या या दलाच्या अध्यक्षपदी पी.डी. हिंदुजा रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ डॉ. सुहास प्रभू यांची निवड केली आहे.तिसऱ्या लाटेमध्ये बालकांना धोका असला तरी एकूण रुग्णांपैकी ४ ते ५ टक्के बालकांनाच रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता भासू शकते. परंतु हे प्रमाण टक्क्यांमध्ये आहे. त्यामुळे प्रत्यक्षात आकड्यांमध्ये संख्या अधिक असू शकते, असे डॉ.सुहास प्रभू यांनी स्पष्ट केले आहे.

आणखी वाचा- विषाणूपासून बालकांना दूर ठेवण्यासाठी राज्याची तयारी

देशभरात चिंताजनक परिस्थिती

गेल्या दोन महिन्यांमध्ये कर्नाटकमध्ये ९ वर्षांखालील ४० हजार मुले करोनाबाधित झाली. तसेच वर्षभरात ४३ लहान मुलांचा मृत्यू झाला. दिल्लीमध्ये दोन महिन्यांत २९ करोनाबाधित बालकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. करोनाच्या पहिल्या लाटेत बालके विषाणूपासून सुरक्षित होती. मात्र दुसऱ्या लाटेमध्ये बालकांनाही त्रास जाणवत आहे.