News Flash

‘करोना’ संशयित जोडप्याच्या शोधात प्रशासनाची दमछाक

तपासणी केंद्रातून पलायन करून माहूरला गेल्याची चर्चा

‘करोना’ संशयित जोडप्याच्या शोधात प्रशासनाची दमछाक
(संग्रहित छायाचित्र)

तपासणी केंद्रातून पलायन करून माहूरला गेल्याची चर्चा

नितीन पखाले, लोकसत्ता

यवतमाळ : इराणहून भारतात आलेले एक मुस्लीम दाम्पत्य ‘करोना’ तपासणी केंद्रातून पलायन करून यवतमाळात दाखल झाल्याचा ई—मेल शुक्रवारी सायंकाळी येथील जिल्हा शल्य चिकित्सकांना प्राप्त झाला होताच या जोडप्याच्या शोधात आरोग्य यंत्रणेची प्रचंड दमछाक झाली. हे जोडपे दिल्लीहून निघून पुणे, नागपूर आणि यवतमाळमार्गे माहूर येथील सोनपीर बाबांच्या दग्र्यात दर्शनासाठी गेल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.

जगात करोना विषाणूचा धुमाकूळ सुरू असताना इराणहून १४ यात्री दिल्ली येथे परतले. हे सर्वजण करोना तपासणी केंद्रात वैद्यकीय निगराणीखाली असतानाच यातील सौदागर अशफाक अहमद आणि त्याची पत्नी सुलताना बेगम अशफाक अहमद हे जोडपे यवतमाळ जिल्ह्यात दाखल झाल्याची माहिती असलेला आरोग्य उपसंचालकांचा  ई-मेल यवतमाळच्या जिल्हा शल्य चिकित्सकांना शुक्रवारी दुपारी प्राप्त झाला. या पत्रामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे यांनी ही माहिती जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांना दिली. जिल्ह्यात सर्वत्र यंत्रणेस अतिदक्षतेचा इशारा देण्यात येऊन या जोडप्याचा शोध घेण्याचे निर्देश देण्यात आले. मात्र या दाम्पत्याचा कुठेही शोध लागला नाही.

काही दिवस तपासणी केंद्रात निगराणीखाली राहिल्यानंतर हे जोडपे तपासणी अर्धवट सोडून पुणे येथे गेल्याची माहिती पुढे आली. तेथून नागपूला आल्याची प्राथमिक माहिती मिळाली. नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे सोनपीर बाबा दग्र्यात जाण्यासाठी नागपूरहून हे दाम्पत्य यवतमाळ मार्गे आल्याची माहिती आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी एम.डी.सिंह ‘लोकसत्ता’ला माहिती देताना म्हणाले, करोनासंदर्भात सर्व तपासण्या होण्याआधीच हे जोडपे केंद्रातून निघून गेल्याची बाब पुढे आली आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनास आरोग्य विभागातून ई—मेल प्राप्त झाल्यानंतर इराणहून आलेल्या करोना संशयित दाम्पत्याचा यवतमाळसह नांदेड जिल्ह्यात सर्वत्र शोध घेण्यात आला. मात्र त्यांचा कुठेही ठावठिकाणी लागला नाही. याप्रकरणी आपण नांदेड जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, पोलीस अधीक्षक आदी सर्व अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याची माहिती जिल्हाधिकारी सिंह यांनी दिली. करोनाबाबत नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी यासाठी परिपत्रक काढण्यात आल्याची माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

आरोग्य विभागाने पाठविलेल्या ई—मेलमध्ये या जोडप्याचा भ्रमणध्वनी क्रमांक नमूद होता. त्यावर प्रशासनाने संपर्क केला. मात्र पलिकडून काहीही प्रतिसाद मिळाला नसल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे यांनी सांगितले. हे दाम्पत्य खरोखरच करोनाबाधित आहे की तपासणी केंद्रात ते केवळ निगराणीखाली होते, ते खरेच माहुरला गेले की यवतमाळ, नांदेड आदी परिसरात कुठे दडून बसले, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. या सर्व प्रश्नांची उकल व्हावी आणि या जोडप्याचा शोध लागावा यासाठी पोलीस यंत्रणेस कळविण्यात आल्याची माहिती डॉ. वारे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

माहूर येथे सध्या सोनपीर बाबा ऊरूस  सुरू आहे. त्यामुळे हे दाम्पत्य नक्कीच माहूर येथे येऊन गेले असावे, असे सांगण्यात येते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 8, 2020 4:23 am

Web Title: maharashtra administrative searching coronavirus suspect couple zws 70
Next Stories
1 गुन्हे शाखेच्या महिला पोलिसावर गोळीबार
2 बचतगटाच्या ‘त्या’ दहा महिलांकडून व्यवसायाचा नवा मंत्र
3 येस बँकेशी संलग्न बँकांचे धनादेश एलआयसीकडून परत
Just Now!
X