सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या आषाढीला २० जुलै रोजी मानाच्या दहा पालख्यांना वाखरी ते पंढरपूर दरम्यान प्रातिनिधिक पायी वारीसाठी परवानगी देण्यात आली आहे.

करोनामुळे गेल्या वर्षी आषाढी वारी होऊ शकली नव्हती. सध्या करोनास्थिती नियंत्रणात असून दुसरी लाट ओसरण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे यंदाची आषाढी वारी परंपरेनुसार होऊ देण्याची मागणी वारकरी संप्रदायाकडून होत होती. मात्र करोनाचा धोका लक्षात घेऊन यंदाही पायी वारीला परवानगी नाकारण्यात आली. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने मंगळवारी आषाढी वारीसंदर्भातील नियमावली जाहीर

के ली. यंदाच्या आषाढी वारीचे आयोजन करताना करोना प्रतिबंधासाठी केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन होईल, याची दक्षता घेण्याचे आदेश आयोजकांना देण्यात आले आहेत.

सर्व मानाच्या पालखी सोहळ्यांचे पंढरपूरमध्ये दशमीच्या दिवशी आगमन होऊन पौर्णिमेच्या दिवशी प्रस्थान करण्यास मान्यता देण्यात आली आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच शासकीय महापूजेला तसेच ‘श्रीं’चे नित्योपचार परंपरेनुसार सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली असली तरी आषाढी यात्रा कालावधीमध्ये भाविकांसाठी दर्शन बंद ठेवण्यात येईल. आषाढी एकादशी दिवशी २० जुलै रोजी स्थानिक महाराज अशा १९५ मंडळींना विठ्ठल-रुक्मिणीमातेचे मुखदर्शन घेण्यास परवानगी देण्यात आली आहे.

संख्येच्या निकषांनुसार..

वारकरी संख्येच्या निकषांनुसार संतांच्या पादुका भेटीसाठी, मानाच्या पालखीसाठी ४० वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. या वर्षी दोन बस व प्रत्येकी बसमध्ये २० प्रमाणे ४० संख्या निश्चित केली आहे.

निर्णय काय?

मानाच्या पालखी सोहळ्यांना विशेष वाहनाद्वारे वाखरी येथे पोहोचल्यानंतर तेथून पंढरपूरकडे दीड किलोमीटर अंतर प्रातिनिधिक स्वरूपात पायीवारी करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

वारकऱ्यांसाठी..

देहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० आणि उर्वरित आठ सोहळ्यांसाठी प्रत्येकी ५० वारकऱ्यांना प्रस्थान सोहळ्यात सहभागी होण्यासही परवानगी देण्यात आली आहे.