अमरावतीच्या दवाखान्यात कार्यरत परिचारिकेचा करोना अहवाल सकारात्मक आल्याने आज (बुधवार) तिच्या तळेगाव येथील दहा नातेवाईकांना विलगीकरणात पाठविण्यात आले. तसंच हा परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.

आर्वी तालूक्यातील तळेगाव येथील राहणारी २२ वर्षीय युवती अमरावतीतील एका रूग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत आहे. तिच्या घरमालकाने घर खाली करण्यास सांगितल्याने ती एका दुधाच्या टँकरच्या चालकाच्या परिचयाने विना अनुमती तळेगावला पोहोचली. परंतु माहिती मिळाल्यावर प्रशासनाने तिला गृह विलगीकरणात ठेवले. परंतु आज तिचा अहवाल सकारात्मक आल्यानंतर एकच खळबळ उडाली.

अमरावतीच्याच रूग्णालयाने रूग्णवाहिका पाठवून सदर युवतीला अमरावतीला उपचारार्थ नेले आहे. तर वर्धा जिल्हा प्रशासनाने हा परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. तसंच तिच्या संपर्कातील ४७ व्यक्तींना गृह विलगीकरणात पाठविण्यात आले. तसेच अधिक संपर्कातील दहा लोकांना वर्ध्यातील सामान्य रूग्णालयात अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. या नातेवाईकांचे घशातील द्रवाचे नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरूषोत्तम मडावी यांनी सांगितले. मंगळवारी सकाळी दहा वाजता सदर युवती अमरावतीतून तळेगावला दाखल झाली होती.