राज्यातील करोना संसर्ग अद्यापही सुरूच आहे. पण दिलासादायक बाब म्हणजे करोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत दररोज वाढ होत आहे. आज दिवसभरात महाराष्ट्रात ३ हजार ०८० जणांनी करोनावर मात केली आहे. तर, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९५.२५ टक्के आहे. आतापर्यंत राज्यात १९ लाख १५ हजार ३४४ जणांनी करोनावर मात केली आहे.

आज दिवसभरात राज्यात १ हजार ८४२ नवे कोरनाबाधित रुग्ण आढळले असून, ३० रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या २० लाख १० हजार ९४८ वर पोहचली आहे. याशिवाय राज्यात ४३ हजार ५६१ सक्रिय रूग्ण आहेत. तर, आतापर्यंत ५० हजार ८१५ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झालेला आहे.

पुण्यात एकाच दिवसात ९८ रुग्ण; एकाचा मृत्यू

पुणे शहरात दिवसभरात ९८ करोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रूग्णसंख्या अखेर १ लाख ८४ हजार ७८० इतकी झाली. आजच्या दिवसात एका रुग्णाचा मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या ४ हजार ७३९ इतकी झाली. त्याचदरम्यान, १२३ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. तर आजअखेर १ लाख ७८ हजार ०१६ रुग्ण करोनामुक्त झाले.