News Flash

“मुंबईत असा कोणता बाबा तयार झाला आहे?”; फडणवीस विधासनभेत आक्रमक

"....तर या विधानसभेचा अर्थ उरणार नाही"

बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांना फेसबुकवरुन धमकी देण्यात आलेल्या प्रकरणावरुन विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. विधानसभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशन सुरु असताना गावगुंडांमध्ये फेसबुक लाइव्ह करुन धमकी देण्याची हिंमत असेल तर या विधानसभेचा अर्थ उरणार नाही अशा शब्दांत संताप व्यक्त केला आहे. दरम्यान यावेळी त्यांनी श्रीरामपूरमध्ये अपहरण झालेल्या व्यापाऱ्याचा मृतदेह सापडल्याचं सांगत पुन्हा एकदा कायदा-सुव्यवस्थेवरुन गृहखात्यावर टीकास्त्र सोडलं.

“मी परवा सभागृहात बोलताना श्रीरामपूरच्या बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरन यांचं अपहरण करण्यात आलं असून गावाने एक लाख रुपये जमा करुन त्यांना शोधा अशी विनंती केली असल्याची माहिती दिली होती. काल त्या गौतम हिरन यांचा मृतदेह सापडला आहे. गावात खूप मोठ्या प्रमाणात असंतोष आहे. आम्ही सातत्याने पोलिसांना माहिती देत होतो, पण त्यावर पोलिसांनी काही कारवाई केली नाही असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. गृहमंत्र्यांनी आज दिवसभारत केव्हाही यासंदर्भात माहिती घेऊन निवेदन करावं. तक्रार केली असताना, रितसर माहिती दिली असताना का कारवाई करु शकले नाही यासंदर्भात माहिती देऊन पोलिसांवर कारवाई करावी अशी मागणी आहे,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांना फेसबुक लाईव्हवरुन धमकी देण्यात आली आहे. मुंबई बाबा नावाच्या गुंडाने सत्ताधारी पक्षाच्या जिल्हाध्यक्षाचा उल्लेख करत आणि त्याच्या केसाला धक्का लागला तर राजेंद्र राऊत यांचे हात पाय मोडून टाकू अशी धमकी दिली आहे. पुढे तो म्हणतोय की, राजेंद्र राऊत तुम्ही संरक्षण घेतलं असलं तरी पोलिसांमध्ये आमचे लोक आहेत. गावगुंड अधिवेशन सुरु असताना फेसबुक लाईव्ह करुन धमकी देण्याची हिंमत दाखवत असेल तर या विधानसभेचा अर्थ उरणार नाही. मुंबईत असा कोणता बाबा तयार झाला आहे जो स्वत:ला एवढा मोठा गुंड समजतो. आजच्या आज त्याला अटक झाली पाहिजे आणि राजेंद्र राऊत यांना संरक्षण दिलं पाहिजे”.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 8, 2021 12:47 pm

Web Title: maharashtra assembly budget session bjp devendra fadanvis vidhansabha rajendra raut sgy 87
Next Stories
1 जयंत पाटलांच्या साखर कारखान्यासमोर आंदोलन करण्याआधीच पहाटे पाच वाजता शेतकरी आंदोलकांना अटक
2 रेल्वेने दिलेल्या धडकेत वाघिणीच्या बछड्याचा मृत्यू
3 मुलीने केला प्रेमविवाह; भाजपाच्या तालुकाध्यक्षांचा जावयावर खुनी हल्ला
Just Now!
X