News Flash

विभाजनानंतरही अमरावती जिल्ह्य़ात पारंपरिक लढतींचे चित्र कायम!

महायुती आणि आघाडीत फाटाफूट झाल्यानंतर अमरावती जिल्ह्यात इच्छूक उमेदवारांना पर्याय उपलब्ध झाले असले तरी पारंपरिक लढतींचेच चित्र असून सात विधानसभा मतदारसंघांमध्ये गेल्या निवडणुकीतील प्रतिस्पर्धीच आमने-सामने

| October 8, 2014 07:33 am

महायुती आणि आघाडीत फाटाफूट झाल्यानंतर अमरावती जिल्ह्यात इच्छूक उमेदवारांना पर्याय उपलब्ध झाले असले तरी पारंपरिक लढतींचेच चित्र असून सात विधानसभा मतदारसंघांमध्ये गेल्या निवडणुकीतील प्रतिस्पर्धीच आमने-सामने आले आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप या चार प्रमुख राजकीय पक्षांखेरीज रिपाइं (गवई गट), बसप, भारिप-बमसं, प्रहार या पक्षांचेही उमेदवार रिंगणात उतरले आहेत.
गेल्या निवडणुकीत जिल्ह्यातून १२९ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. ही संख्या यंदा १३५ पर्यंत गेली आहे. अनेक बंडखोर उमेदवारांना अन्य पक्षांची अधिकृत उमेदवारी मिळाल्याने त्यांना अपक्ष म्हणून वावरण्याची आवश्यकता नसली, तरी अपक्षांची संख्या यावेळीही लक्षणीय आहे. मात्र, बहुतांश मतदारसंघांमध्ये गेल्या निवडणुकीतील लढतींचीच पुनरावृत्तीची चिन्हे आहेत. अमरावती मतदारसंघात काँग्रेसचे रावसाहेब शेखावत आणि भाजपचे डॉ. सुनील देशमुख पुन्हा झुंज देणार आहेत. गेल्या निवडणुकीत काँग्रेसची उमेदवारी न मिळाल्याने डॉ. देशमुखांनी बंड केले होते, पण यावेळी त्यांनी भाजपची उमेदवारी स्वीकारली. शिवसेना आणि राष्ट्रवादीसह इतर उमेदवार रिंगणात असले, तरी या दोघांमध्ये मुख्य लढतीचे संकेत आहेत. बडनेरा मतदारसंघात काँग्रेसतर्फे सुलभा खोडके आणि राष्ट्रवादी समर्थित अपक्ष रवी राणा यांच्यात पुन्हा लढत होईल. भाजपचे तुषार भारतीय आणि शिवसेनेचे संजय बंड यांचा या मतदारसंघात प्रथमच प्रवेश झाला आहे.
गेल्या वेळी थेट लढत झाली. यावेळी त्याला चौरंगी स्वरूप मिळाले आहे. तरी सुलभा खोडके आणि रवी राणा यांच्यातच खरी चुरस आहे. धामणगाव रेल्वे मतदारसंघातून काँग्रेसचे वीरेंद्र जगताप आणि भाजपचे अरुण अडसड यांच्यात पुन्हा सामना होणार आहे. शिवसेना आणि इतर पक्ष जोर अजमावित असले, तरी मुख्य मुकाबला या दोघांमध्येच आहे.
दर्यापूरमधून गेल्या वेळी २५ जण रिंगणात होते. यावेळी ही संख्या १९ वर आली आहे, पण शिवसेनेचे अभिजीत अडसूळ आणि रिपाइंचे बळवंत वानखडे हे पुन्हा झुंजतील. काँग्रेसचे सिद्धार्थ वानखडे, राष्ट्रवादीचे दिनेश बूब, मनसेचे गोपाल चंदन यांनी रंगत वाढवली आहे. मेळघाटमधून काँग्रेसचे केवलराम काळे आणि राष्ट्रवादीचे राजकुमार पटेल यांच्यात पुन्हा चुरशीची लढत होईल. अचलपूरमध्ये देखील प्रहारचे बच्चू कडू आणि राष्ट्रवादीच्या वसुधा देशमुख हे दोघे प्रतिस्पर्धी आमोरे-सामोरे आहेत. यावेळी वसुधा देशमुख यांना मात्र राष्ट्रवादीकडून लढावे लागत आहे. काँग्रेसचे बबलू देशमुख, शिवसेनेतर्फे सुरेखा ठाकरे या रिंगणात आहेत.
या ठिकाणी चौरंगी लढतीचे चिन्हे आहेत. मोर्शीतून भाजपचे डॉ. अनिल बोंडे, राष्ट्रवादीचे हर्षवर्धन देशमुख, काँग्रेसचे नरेशचंद्र ठाकरे यांच्यात पुन्हा लढत होणार आहे. गेल्या निवडणुकीत डॉ. बोंडे हे अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात होते. यावेळी त्यांना भाजपकडून संधी मिळाली आहे. अमरावती जिल्ह्यात अनेक ठिकाणी प्रमुख राजकीय पक्षांनी नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. त्यात बडनेरातून भाजपचे तुषार भारतीय, अचलपुरातून भाजपचे अशोक बन्सोड, दर्यापुरातून राष्ट्रवादीचे दिनेश बूब, धामणगावमधून शिवसेनेचे सिद्धेश्वर चव्हाण आदींचा समावेश आहे. हे उमेदवार काही चमत्कार करू शकतील काय, हा सध्या औत्सुक्याचा विषय आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2014 7:33 am

Web Title: maharashtra assembly election in amravati constituency
टॅग : Loksatta,Mahayuti
Next Stories
1 विदर्भात घराणेशाहीची परंपरा
2 उमेदवारांचे मतदारसंघ कोसो दूर, पण वास्तव्य मात्र यवतमाळातच!
3 चंद्रपुरात पोलिस शिपायाची गोळ्या झाडून आत्महत्या
Just Now!
X