28 March 2020

News Flash

भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीत काटय़ाची लढत

युती व आघाडीतील बिघाडीमुळे मतदार संभ्रमावस्थेत असल्याने या जिल्ह्य़ातील सहाही विधानसभा मतदारसंघात चित्र अस्पष्ट असले तरी बल्लारपूर व चिमूर येथे भाजपविरुध्द कॉंग्रेस, अशी सरळ लढत,

| October 15, 2014 06:43 am

युती व आघाडीतील बिघाडीमुळे मतदार संभ्रमावस्थेत असल्याने या जिल्ह्य़ातील सहाही विधानसभा मतदारसंघात चित्र अस्पष्ट असले तरी बल्लारपूर व चिमूर येथे भाजपविरुध्द कॉंग्रेस, अशी सरळ लढत, तर राजुरा, वरोरा व ब्रम्हपुरीत तिरंगी आणि चंद्रपुरात अतिशय चुरशीच्या चौरंगी लढतीचे चित्र आहे.
गेल्या बारा दिवसात प्रचाराचा धुराळा उडाला तरी सहाही मतदारसंघात मतदार संभ्रमावस्थेत आहेत. त्यामुळे तो कौल कोणाच्या बाजूने देईल, हे सांगणे कठीण आहे. बल्लारपूर व चिमुरात भाजपविरुध्द काँग्रेस थेट लढत आहे. राजुरा, वरोरा व ब्रम्हपुरीत तिरंगी आणि चंद्रपुरात चौरंगी लढत आहे. अनुसूचित जातीसाठी राखीव चंद्रपूर मतदारसंघात भाजपचे नाना शामकुळे यांना शिवसेनेचे किशोर जोरगेवार, राष्ट्रवादीचे अशोक नागापुरे व कॉंग्रेसचे महेश मेंढे यांचे आव्हान आहे. स्थानिकत्वाचा मुद्दा शिवसेना व राष्ट्रवादीने प्रचारात वापरल्याने शामकुळेंची अडचण झाली आहे. शामकुळे केवळ बौध्द-दलित मतांवर विसंबून आहेत, तर हिंदू दलित, मुस्लिम व ओबीसी मते निर्णायक आहे. भाजपाने अन्याय केल्याची भावना मतदारांमध्ये रुजविण्यात यश आल्याने सेनेचे जोरगेवार यांच्या पाठीशी मतदारांची सहानुभूती आहे. राष्ट्रवादीचे अशोक नागापुरे दलित, मुस्लिम, ख्रिश्चन, हिंदू दलितांचे सर्वमान्य उमेदवार ठरले आहेत. कॉंग्रेसचे महेश मेंढे यांच्या पाठीशी पक्षाची पारंपरिक मते आहेत.
बल्लारपूर मतदारसंघात भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार व कॉंग्रेसचे घनश्याम मुलचंदानी यांच्यात काटय़ाची लढत आहे. मुनगंटीवारांसाठी सोपी वाटणारी ही लढत कॉंग्रेसच्या एकत्रिकरणामुळे चुरशीची झाली आहे. दारूविक्रेते विरुध्द दारूबंदी आंदोलक महिलांमुळे या लढतीकडे सर्वाचे लक्ष आहे. तरीही मुनगंटीवार अनुभवी राजकारणी असल्याने त्याचा फायदा निश्चितच होणार आहे. चिमूर मतदारसंघात भाजपचे किर्तीकुमार भांगडियांविरुध्द काँग्रेसचे डॉ.अविनाश वारजूकर यांच्यात सरळ लढत आहे. माना समाजाची मते येथे निर्णायक राहतील. सर्वाधिक २९ उमेदवार याच मतदारसंघात असल्याने मतविभाजनाच्या शक्यतेने संभ्रम वाढला आहे. राजुरा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार सुभाष धोटे, राष्ट्रवादीचे सुदर्शन निमकर व भाजपचे अ‍ॅड. संजय धोटे यांच्यात तिरंगी लढत आहे. येथे शेतकरी संघटनेचा उमेदवार प्रभावी नसल्याने ही मते निर्णायक आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी व काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सभांमुळे ब्रम्हपुरीची लढत चुरशीची झाली आहे. भाजपचे प्रा.अतुल देशकर, काँग्रेसचे विजय वडेट्टीवार व राष्ट्रवादीचे संदीप गड्डमवार यांच्यात काटय़ाची लढत आहे. येथे मतविभाजनाचा फायदा नेहमीच भाजपला होत आलेला आहे. त्यामुळे मतविभाजन होणार नाही, याची काळजी काँग्रेस व राष्ट्रवादी घेत आहे. भाजप या दोन्ही पक्षांची मते कशी विभागतील यासाठी प्रयत्नशील आहे. वरोरा मतदारसंघात काँग्रेसच्या डॉ.आसावरी देवतळे, भाजपचे संजय देवतळे व शिवसेनेचे बाळू धानोरकर यांच्यात तिरंगी लढत आहे. काँग्रेसमधून ऐनवेळी भाजपात गेल्याने देवतळे यांच्याप्रती मतदारांमध्ये असलेली नाराजी डॉ आसावरींसाठी फायद्याची ठरत आहे. तीन प्रमुख उमेदवार असले तरी खरी लढत डॉ.आसावरी व धानोरकर यांच्यातच होईल, असे चित्र आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2014 6:43 am

Web Title: maharashtra assembly election in chandrapur
Next Stories
1 भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादीतच तिरंगी लढत
2 भंडारा जिल्ह्य़ात तिरंगी, तर गोंदियात चौरंगी लढतीचे चित्र!
3 वर्धा जिल्ह्य़ात ४ आमदारांना आव्हान
Just Now!
X