या जिल्ह्य़ातील विधानसभेच्या सात मतदारसंघात निवडणूक लढत असलेले कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपचे बहुतेक उमेदवार यवतमाळातच बंगले बांधून राहतात. मात्र, प्रतिनिधित्व ते यवतमाळबाहेरील मतदारसंघाचे करतात, हे एक आगळेवेगळे वैशिष्टय़ आहे. जनतेचे त्यांच्यावर अलोट आणि निव्र्याज प्रेम असल्याने कुणीही त्यांना याबाबत प्रश्न विचारत नाही, हा भाग वेगळा.
राळेगाव मतदारसंघातील कॉंग्रेसचे वसंत पुरके यवतमाळात कला आणि वाणिज्य महाविद्यालय प्राध्यापक होते. त्यांचा बंगला यवतमाळातच आहे. भाजपचे उमेदवार प्रा. अशोक उईके तिवस्याला प्राध्यापक आहेत, पण त्यांचे घर यवतमाळात आहे. राष्ट्रवादीचे मिलिंद धुर्वे गॅस एजन्सीचे मालक आहेत. त्यांचे भाडय़ाचे घर मात्र यवतमाळातच आहे. आर्णी मतदारसंघातील कॉंग्रेसचे शिवाजीराव मोघे यांचा बंगला यवतमाळात आहे. त्यांचे पुसद तालुक्यातील मूळ गाव धरणात गेल्याने दिग्रस तालुक्यातील वसंतपूरमध्ये आश्रयाला आले, पण विधानसभेच्या सर्व निवडणुका जय पराजय पचवत त्यांनी केळापूरमधून लढवल्या. आता केळापूरचे नाव बदलून आर्णी, असे झाले आहे. मोघे यांचा बंगला सुध्दा यवतमाळातच आहे. याच मतदारसंघातील भाजपचे माजी आमदार आणि आता सेनेची उमेदवारी  घेतलेले डॉ. संदीप धुर्वे यांचा बंगला आणि वैद्यकीय व्यवसायहा यवतमाळातच आहे. दिग्रस मतदारसंघाचे दहा वर्षांंपासून प्रतिनिधित्व करीत असलेले सेनेचे उमेदवार संजय राठोड यांचाही बंगला यवतमाळातच, तर कांॅग्रेसचे जिल्हा परिषदेचे माजी सभापती या मतदारसंघातील उमेदवार देवानंद पवार यांचाही बंगला यवतमाळातच आहे. यवतमाळच्या दाते महाविद्यालयातून कला पदवीधर झालेले व कॉंग्रेसचे उमेदवार असलेले राहुल ठाकरेंचे मूळ गाव दारव्हा आहे. मात्र, त्यांचे राहणे कांॅग्रेस प्रदेशाध्यक्ष असलेले वडील माणिकराव ठाकरे यांच्या बंगल्यातच आहे. वणी मतदारसंघातील कॉंग्रेस उमेदवार वामनराव कासावार यांचे वणी तालुक्यतील पाटण येथे घर असले तरी त्यांचाही यवतमाळातच बंगला आहे. शिवाय, आपला दुसरा बंगला त्यांनी जिल्हा कॉंग्रेस कमिटीला दान दिला आहे. बहुतेक उमेदवारांना यवतमाळची हवा मानवली असून त्यांच्या प्रगतीचा आलेख यवतमाळातच लाभदायी ठरला आहे. त्यामुळे ते सारे ‘हम है वासी यवतमाल के, हमसे कुछ न पुछिये’ म्हणत मतदारांची सेवा करीत आहेत.