वृत्तपत्रातील सर्व बातम्यांवर विश्वास ठेवत जाऊ नका, काही वार्ताहरांजवळ अनौपचारिक बोलणेही अनौपचारिक राहत नाही, असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे आमदार संजय दत्त यांनी दिला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘सुयोग’मध्ये पत्रकारांसोबत वार्तालाप केला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात नाणार प्रकल्प होणारच अशी बातमी छापून आली होती. या बातमीकडे मंगळवारी संजय दत्त यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. यावर मुख्यमंत्री म्हणाले, उद्या वृत्तपत्रात काँग्रेसचे आमदार संजय दत्त भाजपात प्रवेश करणार अशी बातमी येईल, त्यावर तुम्ही विश्वास ठेवणार का, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी विचारला. यावर संजय दत्त यांनी देखील प्रत्युत्तर दिले.

मुख्यमंत्री ज्यादिवशी काँग्रेसमध्ये येतील, त्यादिवशी नक्कीच विचार करू, असे संजय दत्त यांनी सांगितले. संजय दत्त यांच्या विधानावर मुख्यमंत्री म्हणाले, मी तुम्हाला भाजपात बोलवतच नाही. आमच्याकडे भरपूर झालेय, असा टोला त्यांनी लगावला. मी सुयोगमध्ये जे बोललो, ते अनौपचारिक होते. वृत्तपत्रातील काही वार्ताहरांची सवय मला माहीत आहे. त्यांच्याकडे कोणत्याही गोष्टी अनौपचारिक राहत नाहीत. त्यामुळे योग्य तेच बोलतो. मी तिथेही कधी अयोग्य बोलत नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. मी स्वतःही कधी वृत्तपत्र वाचत नाही, असे ते म्हणाले.