मराठा आरक्षणावरुन विरोधकांनी ओबीसी समाजाच्या मनात भीती निर्माण केली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळू नये असा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा डाव आहे. यासाठी त्यांचे मागच्या दाराने प्रयत्न सुरु आहेत, असा पलटवार विनोद तावडे यांनी विधानसभेत केला आहे.

हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मराठा आरक्षणावरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ताधाऱ्यांची कोंडी केली. सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल तातडीने सभागृहात सादर करावा, सत्ताधाऱ्यांचा हेतू चांगला नाही. त्यांना फक्त फसवणूक करायची आहे, असा आरोप विधान सभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे- पाटील यांनी केला. धनगर समाजाबाबतही ‘टीस’ने अहवाल दिला आहे. तो अहवाल देखील सभागृहात मांडावा, असे त्यांनी सांगितले. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी देखील सत्ताधाऱ्यांवर टीका केली. विधानसभेतील २८८ आमदारांचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे. पण ५२ टक्क्यांना धक्का न लागता हे आरक्षण मराठा समाजाला मिळावे. घटनात्मक पेच निर्माण होणार असेल तर मागासवर्गीय अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेऊ नका, अशी भूमिका त्यांनी मांडली.

विरोधकांच्या या आरोपांवर विनोद तावडे यांनी विधानसभेत उत्तर दिले. ओबीसी समाजाच्या मनात भीती निर्माण करण्याचे काम विरोधकांनी केले आहे. आज सभागृहात अहवाल पटलावर ठेवावं अशी मागणी विरोधक करत आहे. अहवाल पटलावर येताच काही वकील याविरोधात कोर्टात जातील. या पद्धतीने मराठा समाजाला आरक्षण मिळू नये असा विरोधकांचा डाव आहे. आम्ही नियमाने कायद्याने, नीट काम करत असताना विरोधी पक्षनेता आणि राष्ट्रवादी काँग्रेस मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी मागच्या दाराने प्रयत्न करत असल्याची टीका त्यांनी केली.

दरम्यान, हिवाळी अधिवेशनात मराठा आणि मुस्लिम समाजाचा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. गदारोळामुळे विधान परिषदेचे कामकाज गुरुवारपर्यंत तहकूब करण्यात आले.