भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून मंगळवारी सलग दुसऱया दिवशी विधानसभेत विरोधकांनी घोषणाबाजी केल्यामुळे सभागृहाचे कामकाज तासभरासाठी तहकूब करावे लागले.
विधानसभेत प्रश्नोत्तराचा तास संपल्यावर राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी आपल्यावरील आरोपांचे स्पष्टीकरण देण्यास सुरूवात केली. मात्र, विरोधक त्यांचे ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. राणे यांचे भाषण सुरू होताच विरोधकांनी भ्रष्टाचारी मंत्री राजीनामा द्या, भ्रष्टाचारी मंत्री राजीनामा द्या अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यातच जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणात माजी राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयात फेटाळल्याची माहिती विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी दिली. यामुळे पुन्हा गदारोळ वाढल्याने अखेर विधानसभा अध्यक्षांनी कामकाज तासाभरासाठी तहकूब केले.