कोलकाता येथील ज्युनिअर डॉक्टरला रूग्णाच्या नातेवाईकांकडून झालेल्या मारहाणीचा निषेध नोंदवण्यासाठी राज्यातली प्रत्येक शासकीय रूग्णालयातले मार्डचे डॉक्टर संपावर गेले आहेत. सकाळी ८ ते संध्याकाळी ५ या दरम्यान हे डॉक्टर संपावर आहेत. या दरम्यान कोणतीही अत्यावशक सेवा बाधित होणार नाही असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. फक्त महाराष्ट्रच नाही तर छत्तीसगढ, दिल्ली या ठिकाणचेही निवासी डॉक्टरही संपावर गेले आहेत.

दिल्ली येथील एम्स रूग्णालयातल्या निवासी डॉक्टरांनीही संप पुकारला आहे. या निषेध आंदोलनामुळे रूग्णांचे होणारे हाल टाळता यावेत यासाठी रूग्णालयांनी विशेष खबरदारी घेतली आहे. दरम्यान केरळमधल्या निवासी डॉक्टरांनी कोलकाता येथे झालेल्या मारहाणीचा निषेध करण्यासाठी संप पुकारला आहे

डॉक्टरांना रूग्णालयांमध्ये सुरक्षित वातावरण दिले गेले पाहिजे, ज्या डॉक्टरवर हल्ला केला गेला त्या आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात यावी अशा मागण्या संपावर गेलेल्या डॉक्टरांनी केल्या आहेत. पश्चिम बंगालमध्ये ज्युनिअर डॉक्टरवर झालेल्या दोन हल्ल्यांमधील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी मार्डच्या डॉक्टरांनी केली आहे. राज्यातली सरकारी आणि पालिका रूग्णालये बंद ठेवणार असल्याची घोषणा सेंट्रल मार्ड या निवासी डॉक्टरांच्या संघटना आणि असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्न्स महाराष्ट्र या कनिष्ठ वैद्यकीय डॉक्टरांच्या संघटनेने केली आहे.