Maharashtra Bandh : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. सकल मराठा समाजाने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. संध्याकाळी ६ वाजेपर्यंत हा बंद पाळण्यात आला. मराठा आंदोलकांकडून मुंबईतही बंद पाळण्यात आला. पुणे, औरंगाबाद, नाशिकमध्ये बंदला हिंसक वळण लागले. तर मुंबईत मराठा आंदोलकांनी काळ्या फिती बांधून आंदोलन केले.
नाशिक, ठाणे आणि नवी मुंबई या तीन शहरांत बंद पाळला गेला नाही. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव ठाणे-नवी मुंबईतील शाळा मात्र बंद ठेवण्यात आल्या होत्या. नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटही बंद ठेवण्यात आलं होती.
दूध, शाळा-महाविद्यालये आणि वैद्यकीय सेवांना या बंदमधून वगळण्यात आले असून बंद सकाळी ८ ते सायंकाळी ६ या वेळेत असेल, असे जाहीर करण्यात आले. २५ जुलै रोजी झालेल्या मराठा क्रांती मोर्चादरम्यान नवी मुंबई आणि ठाणे शहरात परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती. त्यामुळे या दोन्ही शहरांत आज बंद पाळण्यात येणार नसल्याचे जाहीर करण्यात आले होते.
पुण्यातील खंडुजी चौकात आंदोलकांनी रास्ता रोको केला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. ४० आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या मालकीच्या वृत्तपत्राच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आली. नांदेडमधील आय.टी. आय. परिसरात सत्यप्रभा या वृत्तपत्राचे कार्यालय आहे. या ठिकाणी मोठा जमाव आला त्यांनी मराठा आरक्षणाच्या घोषणा दिल्या. त्यानंतर वृत्तपत्राच्या कार्यालयावर दगडफेक झाली. याच भागात असलेल्या दै. पुढारी कार्यालयावरही दगडफेक करण्यात आली.
पुण्यात बंदला चांदणी चौकात हिंसक वळण लागले होते. इथे दगडफेक झाली, जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराचा वापर करावा लागला पण परिस्थिती आता नियंत्रणात असल्याची माहिती आहे.
पुण्यात कोथरूड डेपो जवळ दगडफेकीत एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे.
मराठा समाजाच्या आंदोलकांनी उर्से टोल नाका या ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. हे आंदोलन साडेसहा तासानंतर थांबवण्यात आले. त्यानंतर आता वाहतूक पूर्वपदावर येण्यास सुरूवात झाली आहे.
लातूर ग्रामीणचे आमदार त्र्यंबक भिसे यांच्या गाडीवर मराठा आंदोलकांनी दगडफेक केली. भिसे यांना आंदोलकांनी धक्काबुक्कीही केली.
पुण्यातील कोथरूड भागातही मराठा बांधवांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. या ठिकाणी टायर जाळून रास्ता रोको करण्यात आला.
मुंबई पुणे महामार्ग मागील सहा तासांपासून ठप्प आहे. मराठा समाजाच्या आंदोलकांनी उर्से टोल नाका या ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. हे आंदोलन अजूनही संपलेले नाही. या ठिकाणी पोलिसांचा फौजफाटा मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आला आहे.
वाळुज एमआयडीसीत २ खासगी वाहने, पोलिसांची एक गाडी पेटवण्याचा प्रयत्न. आंदोलकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या.
रेल रोकोमुळं नगरसोल-नरसापूर, सचखंड, तपोवन एक्स्प्रेस औरंगाबाद रेल्वे स्थानकातच थांबवल्या.
आंदोलन शांततेत करा, हिंसा टाळा, मराठा आंदोलन समन्वयकांचे आवाहन
पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवरील उर्से टोल नाक्यावर आंदोलन
चांदणी चौकात पोलिसांवर दगडफेक झाल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. यानंतर आंदोलकांनी पुणे बंगळुरू महामार्ग रोखला. त्याचप्रमाणे मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवरही आंदोलन सुरूच आहे अशीही माहिती मिळते आहे.
हयात हॉटेलमधील कार्यक्रम आंदोलकांनी बंद पाडला. चांदणी चौकातही आंदोलकांकडून रास्ता रोको
मराठा आंदोलनादरम्यान पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर चढून आंदोलकांनी आतमध्ये प्रवेश केला. गेटची तोडफोड केली तसेच वॉचमन केबीनचीही तोडफोड केली. ही सगळी मुले १८ ते २० वर्षांची होती असे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
पुण्यातील चांदणी चौकात बंदला हिंसक वळण लागल्याची माहिती आत्ताच समोर आली आहे. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठी चार्ज केला आहे. आंदोलकांनी दगडफेक सुरू केल्याने पोलिसांना हा लाठीचार्ज करावा लागला. आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली त्यानंतर हा निर्णय पोलिसांना घ्यावा लागला.
लातूरमध्येही मराठा आंदोलनाला गालबोट लागले आहे. काँग्रेस आमदार त्र्यंबक भिसे यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. नाशिकमधला प्रकार ताजा असतानाच आता पुन्हा एकदा असाच प्रकार लातूरमध्ये घडला आहे.
नाशिकमध्ये ठिय्या आंदोलन सुरू असताना मराठा आंदोलकांमध्येच बाचाबाची झाली. शब्दाला शब्द वाढत गेल्याने दोन गटांमध्ये धक्काबुक्की झाली. माजी आमदार माणिकराव कोकाटे स्टेजवर गेले तेव्हा गोंधळ सुरू झाला. त्याचे रूपांतर बाचाबाचीत आणि नंतर वादावादीत झाले. त्यानंतर दोन गटांमध्ये धक्काबुक्कीही झाली.
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मराठा समाजाचे आंदोलक शिरले असून गेटची तोडफोड केली. आंदोलकांनी भिंतीवर चढून दिवे फोडले. तसेच वॉचमन केबिनच्या काचा फोडल्याचीही माहिती समोर येते आहे.
जाणून घ्या काय आहेत मराठा समाजाच्या मागण्या
बातमीसाठी लिंकवर क्लिक करा
पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरील आंदोलनाला हिंसक वळण लागलं असून आंदोलक गेट तोडून आतमध्ये घुसले आहेत.
नाशिकमध्ये ठिय्या आंदोलन सुरु असताना अचानक मोर्चा काढण्यात आला. आंदोलक नियंत्रणाबाहेर गेले असून पोलीस त्यांना अडवण्याचा प्रयत्न करत आहेत. आंदोलक शहर बंद करण्याचा प्रयत्न करत असून काही ठिकाणी वाहनांची तोडफोड करण्यात आल्याचंही वृत्त आहे.
पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली असून आंदोलक आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापटी सुरु आहे. आंदोलकांनी गेटवरील दिव्यांची तोडफोड केली आहे.
लोणावळ्यात कुर्ला-कोईमतूर एक्स्प्रेस रोखण्यात आली आहे
आंदोलकांनी गेटवर चढून जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश करत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना निवेदन दिले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी इंटरनेट बंद करण्याचा कोणताही आदेश दिला नसल्याचा दावा केला.
मराठा मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी कोल्हापूरचे शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांचा विधान भवनावर धडक मोर्चा. विधानभवनाच्या प्रांगणात जाण्यापासून सुरक्षारक्षकांनी रोखल्याने आबिटकरयांचं विधानभवन प्रवेशद्वारावरच ठिय्या आंदोलन सुरु.
विरारमध्ये आंदोलनादरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग आंदोलकांनी रोखला असून सकाळी साडे दहा वाजल्यापासून दोन्ही दिशेची वाहतूक बंद आहे. वाहनांची संख्या कमी असल्याने वाहतूक कोंडी झालेली नाही.
सोमवार पेठेतील सीताराम थोपटे भाजी मंडईत मराठा आंदोलकांचा राडा, भाजीचे स्टॉल उधळून लावले, पोलीस घटनास्थळी
पुण्यात महाराष्ट् बंदला हिंसक वळण लागलं आहे. पीएमटी बसवर आंदोलकांनी दगडफेक केली आहे.
चाकण एमआयडीसीमधील कामकाज ठप्प झाले असून दीड हजार छोट्या-मोठ्या कंपन्या बंद आहेत. दोन लाख कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्यात आली असून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. आजचे काम सुट्टी दिवशी करून घेतलं जाईल.
नाशिकमध्ये चांदवड येथे आंदोलकांनी मुंबई-आग्रा महामार्ग रोखला. रिंगण करत आंदोलकांनी महार्गावरील वाहतूक रोखली.
जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील कान्हे फाटा येथे भजन कीर्तनातून शासनाचा निषेध करण्यात येत आहे.
नवी मुंबईला बंदमधून वगळण्यात आलं असलं तरी सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आली असून कळंबोली परिसराला छावणीचं स्वरुप आलं आहे.
हिंसाचार नंतर चाकण आज पुन्हा एकदा बंद आहे. रास्ता रोको न करता शांततेत बंद पार पडणार आहे. पोलिसांनी मात्र चोख बंदोबस्त ठेवला असून ड्रोनद्वारे लक्ष ठेवलं जात आहे. पोलीस साध्या वेशात तैनात करण्यात आले आहेत.
सोलापूर - पुणे राष्ट्रीय महामार्ग आंदोलकांनी रोखला असून वाहतुकीवर परिणाम झाला आहे. कोंडी गावाजवळ बैलगाडी, नांगर घेऊन रास्ता रोको सुरु आहे. याशिवाय नागपूर - मुंबई महामार्गावरही आंदोलन सुरु असून वाहतूक खोळंबली आहे.
सकल मराठा आंदोलकांनी मुंबई-गोवा महामार्गावरची वाहतूक महाड चांभार खिंड येथे रोखून धरली आहे. रायगड जिल्ह्यात महाविद्यालय आणि शाळा सुरू असल्या तरी बाजारपेठा बंद आहेत.
नगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी आंदोलनाला सुरुवात झाली आहे. इम्पोरियल चौकात आंदोलन सुरु आहे. आंदोलकांनी नगर - मनमाड महामार्ग अडवला आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटीलही आंदोलनात सहभागी झाले आहेत.