आजच दुपारीच महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गृहविलगीकरण बंद करण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयानंतर अवघ्या काही वेळातच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी मुंबईत मात्र गृहविलगीकरणास परवानगी राहणार असल्याची माहिती दिली. सीएनएन न्यूज १८ने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

महापालिका प्रशासनाने गृहविलगीकरणासंदर्भातल्या नियमावलींमधला अनिवार्य हा शब्द काढून टाकला आहे. त्यांनी सांगितलं की, ग्रामीण भागाकडे सध्या जास्त लक्ष केंद्रित करुन ,संस्थात्मक विलगीकरणावर भर देणं गरजेचं आहे. त्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव रोखता येणं शक्य होईल.

आणखी वाचा- आम्ही पैसे देतो, आम्हाला लस खरेदी करून द्या; राजेश टोपेंचं केंद्राला कळकळीचं आवाहन

राज्यातल्या करोना आकडेवारीच्या सरासरीपेक्षा अधिक रुग्ण असलेल्या जिल्ह्यांमध्ये गृहविलगीकरण संपूर्णपणे बंद कऱण्याचे आदेश दिल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. म्युकरमायकोसिस आणि करोना या दोन आजारांसंदर्भातल्या आज झालेल्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना टोपे म्हणाले, “जे जिल्हे रेड झोनमध्ये आहेत त्या जिल्ह्यांमध्ये गृहविलगीकरण १०० टक्के बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. सर्व बाधितांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातल्या कोविड केअर सेंटर्सची संख्या वाढवण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.”

आणखी वाचा- Maharashtra Covid 19: या १८ जिल्ह्यांमध्ये होम आयसोलेशन बंद; कोव्हिड केंद्रातच व्हावं लागणार दाखल

राज्यात सध्या सातारा, सिंधुदूर्ग, रत्नागिरी, उस्मानाबाद, बीड, रायगड, पुणे, हिंगोली, अकोला, अमरावती, कोल्हापूर, ठाणे, सांगली, गडचिरोली, वर्धा, नाशिक, अहमदनगर, लातूर हे जिल्हे रेड झोनमध्ये आहेत.