देशभरासह महाराष्ट्रात करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती अद्याप नियंत्रणात आलेली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाविकास आघाडीचं सरकार या परिस्थितीचा सामना करत आहे. मात्र विरोधी पक्षात असलेल्या भाजपने करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवरुन ठाकरे सरकारला कोंडीत पकडण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र सरकार करोना बाधितांचे आकडे लपवत असल्याचा आरोप विरोधीपक्षा केला होता. यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाने करोनाविषयी उचलण्यात आलेल्या पावलांविषयी माहितीवर, भाजपने प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे.

गेल्या ३ महिन्यांपासून महाराष्ट्र सरकार करोनाशी मुकाबला करत असून, या साथीला नियंत्रणात ठेवण्यत आलं आहे. चाचण्यांचा वेग लक्षणीयरित्या वाढला असून रुग्ण बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाणही वाढले आहे, अशा आशयाचं ट्विट मुख्यमंत्री कार्यालयाने केलं होतं.

या माहितीवर प्रश्नचिन्ह निर्माण करताना, भाजपने महाराष्ट्र आणि मुंबईमधील करोनाबाधित रुग्णांची संख्या देत ४० टक्के महाराष्ट्र रेड झोनमध्ये असताना नक्की नियंत्रणात काय आहे, करोनाची स्थिती की आमदारकी असा खोचक सवाल विचारला आहे.

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषदेवर नियुक्तीवरुन बराच गदारोळ माजला होता. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेमणुकीसंदर्भात दाखवलेल्या तांत्रिक गोष्टीमुळे उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद धोक्यात आलं होतं. मात्र यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केल्यानंतर राज्यातील ९ विधानपरिषदेच्या जागांची निवडणूक जाहीर करण्यात आली. या घोषणेनंतर उद्धव ठाकरे यांचा आमदार म्हणून निवडून जाण्याचा रस्ता मोकळा झाल्याचं जवळपास निश्चीत मानलं जात आहे.