महाराष्ट्रामधील भाजपाचे १२ आमदार आणि राज्यसभेतील खासदार लवकरच स्वगृही म्हणजेच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये परतण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त भाजपाने फेटाळून लावले आहे. “महाविकास आघाडीतील पक्षांनाच त्यांचे आमदार फुटण्याची भिती असल्याने अशा खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत,” असं भाजपाचे आमदार आशिष शेलार म्हणाले आहेत. भाजपाचा एकही आमदार पक्ष सोडणार नाही असंही शेलार यांनी स्पष्ट केलं आहे.

शिवेसना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षांमध्येच प्रचंड नाराजी असल्याने ती लपवण्यासाठी अशा बातम्या पेरल्या जात असल्याचा आरोप शेलारांनी केला आहे. “ही बातमी म्हणजे चोराच्या उलटा बोंबा अशाप्रकारची आहे. भाजपाचा एकही आमदार पक्ष सोडणार नाही. महाविकास आघाडीलाच आमदार फुटण्याची भिती आहे. याच भितीपोटी भाजपाचे आमदार पक्ष सोडून जाण्याच्या बातम्या पसरवल्या जात आहेत,” असं शेलार म्हणाले. तसेच महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकमेकांवर नाराज असल्याने ते लपवण्यासाठी हे प्रयत्न केले जात आहेत असंही शेलार म्हणाले आहेत. “मंत्रीपदांच्या अपेक्षांवर स्वपक्षाचे तसेच अपक्ष आमदार आतापर्यंत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने संभाळले. सरकार स्थापन करताना वाटेल तशी आश्वासने दिली सरकार स्थापन कऱण्यासाठी आणि आता ती पाळणे या सरकारला शक्य होत नाहीय. पक्षातील आमदारांची अस्वस्थता बंडाचं रुप घेऊ लागलीय म्हटल्यावर अन्य पक्षातील आमदार आमच्याकडे येऊ शकतात असं म्हणून स्वत:ची भिती लपवण्यासाठी वातावरण तयार करण्याचा हा प्रयत्न आहे. समोरचे तिन्ही पक्ष नाराज आहेत. आम्ही या वृत्ताचे आम्ही खंडन करतो. भाजपाचा कुठलाही आमदार कोणाच्याही संपर्कात नाही,” असं स्पष्टीकरण शेलार यांनी दिलं आहे.

आणखी वाचा- भाजपाला मोठा धक्का… १२ आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत?

यावेळी बोलताना शेलार यांनी भाजपाने दरवाजे बंद केल्याने राज्यात राजकीय भूकंप झाला नाही असं म्हटलं आहे. “आम्ही आमचे दरवाजे बंद केलेत म्हणून नाहीतर मोठा भूकंप कधीच झाला असता. बघत राहा पुढे काय होतयं ते,” असे सूचक विधान शेलार यांनी केलं आहे.

काय आहे प्रकरण

विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केलेले नेते पुन्हा जाण्याच्या तयारीत आहेत. इतकच नाही तर भाजपामधील काही नाराज नेतेही इतर पक्षात जाण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. १२ आमदारांबरोबरच राज्यसभेतील एका खासदारानेही राजीनामा देऊन महाविकास आघाडीबरोबर येत पोटनिवडणुक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. निवडणुकीदरम्यान भाजपाला विरोध करणाऱ्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या अनेक आमदारांना सरकारी निर्णयांचा फटका बसला होता. यापैकी अनेक आमदार हे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांमधील शिक्षण सम्राट तसेच साखर कारखाना श्रेत्राशी संबंधित आहेत. यासंदर्भातील माहिती महाविकास आघाडीच्या नेत्यांनीच दिल्याचे वृत्त ‘द इकमॉनिक टाइम्स’ने दिले आहे.