पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर हिंसाचार उफाळला आहे. तृणमूल काँग्रेस आणि भाजपा नेत्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु केले आहेत. हिंसाचाराला सर्वस्वी तृणमूल काँग्रेस जबाबदार असल्याचा दावा भाजपा नेत्यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पश्चिम बंगालच्या राज्यपालांना फोन करून हिंसाचाराबाबत चिंता व्यक्त केली आहे. तसेच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डाही पश्चिम बंगाल दौऱ्यावर गेले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजपानेही पश्चिम बंगालमधील घटनांचा निषेध करणार आहे. तसेच उद्या राज्यभर ठिकाठिकाणी निदर्शनं करण्याचं ठरवलं आहे.

भाजपा नेते आणि प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे. ‘पश्चिम बंगालमध्ये निकालानंतर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर हिंसाचार सुरु केला असून भाजपा कार्यकर्त्यांचे खून करण्यात येत आहेत. या राजकीय हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते उद्या राज्यभर ठिकठिकाणी निदर्शनं करणार अशी माहिती भाजपा अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.’, असं ट्विट केशव उपाध्ये यांनी केलं आहे.

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी तिसऱ्यांदा सत्ता मिळवली आहे. निवडणुकीपूर्वी भाजपा आणि तृणमूल काँग्रेसनं ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. आता निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर सुडाचं राजकारण सुरु असल्याचा आरोप भाजपा नेत्यांनी केला आहे. तर तृणमूल काँग्रेसनं हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.