राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प आज मांडण्यात आला. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत तर अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत अर्थसंकल्प मांडला. अर्थसंकल्प मांडला जात असताना विरोधकांनी अर्थसंकल्प फुटला असून अर्थमंत्री बोलण्याआधीच ट्विटरला ट्विट पडत असल्याचा आरोप केला होता. यानंतर विधानसभेतून विरोधकांनी सभात्याग केला होता. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण देत अर्थसंकल्प फुटला नसल्याचं सांगितलं. तसंच विरोधकांनी डिजिटलं माध्यमं समजून घ्यावीत असा टोलाही लगावला.

‘विरोधकांनी केलेल्या आरोपानंतर मी तपासून पाहिले. ट्विटरवर आलेले सर्व ट्विट हे भाषणाआधी आलेले नाहीत. त्यात १५ मिनिटांचं अंतर आहे. केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावेळी पीएमच्या ट्विटमध्ये फक्त २ ते ३ मिनिटांचं अंतर असतं. त्याची लाईव्ह बातमीही सुरु असते’, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, ‘डिजिटल मीडियादेखील अर्थसंकल्पाची दखल घेत असतं. विरोधी पक्षांनी ही माध्यमं समजून घ्यावीत. आमच्यावर टीका करण्यासाठी विरोधक ट्विटरचा वापर करतात, पण आम्ही सकारात्मक वापर करत आहेत यामुळे त्यांनी आक्षेप घेऊ नये’. यावेळी त्यांनी विरोधकांनी पुन्हा सभागृहात यावं असं आवाहनही केलं होतं.

अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर हे अर्थसंकल्प सादर करत असताना विरोधकांनी विधान परिषदेतही गोंधळ घातल्याचे पहायला मिळाले. दरम्यान, अर्थसंकल्प फुटला असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला. विधानसभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार अर्थसंकल्प मांडत असताना त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर अर्थसंकल्पातील मुद्दे टाकले जात आहेत, असेही धनंजय मुंडे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

या संपूर्ण प्रकरणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सभागृह नेते चंद्रकांत पाटील आणि अर्थमंत्र्यांनी माफी मागावी अशी मागणी मागणी मुंडे यांनी केली. त्यांच्या या मागणीनंतर झालेल्या गदारोळामुळे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सभागृहाचे कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब केले होते.