महाविकास आघाडीचा पहिलाच अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळ सदस्य म्हणजेच आमदारांना मोठा दिलासा दिला. आमदार निधीमध्ये थेट ५० टक्के वाढ करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. यासंदर्भातील घोषणा अजित पवार यांनी केली अर्थसंकल्पाचे वाचन करताना केली. मात्र ही वाढ का करण्यात आली यासंदर्भातील स्पष्टीकरणही पवारांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिलं आहे.

निधी वाढवण्यासंदर्भात अर्थसंकल्प सादर करताना काय म्हणाले पवार?

“आमदार स्थानिक विकास कार्यक्रमाअंतर्गत सर्व विधीमंडळ सदस्यांना मतदारसंघातील विकासकामे करण्यासाठी दरवर्षी विधीमंडळ सदस्या निधी उपलब्ध करून देण्यात येतो. २०११ मध्ये मी अर्थमंत्री असताना हा निधी दीड कोटींवरून दोन कोटी असा केला होता. आता दोन कोटींवरून तीन कोटी वाढ करण्यात येत आहे. आमदार स्थानिक विकास निधीच्या रकमेत वार्षिक १० टक्के रक्कम शासकीय मालमत्तांच्या देखभाल-दुरूस्तीसाठी राखीव ठेवण्याचे प्रयोजन आहे.”

भाजपाने आमदार निधीत वाढ केली नाही

“स्वत: देवेंद्रजींनी, सुधीर मुनगंटीवारांनी कधी आमदार निधीत वाढ केली नाही. आताच्या सरकारने आमदार निधी दोन कोटीवरुन तीन कोटी रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये भेदभाव केलेला नाही. सर्व आमदारांचा निधी वाढवून देण्यात आला आहे. सर्व आमदार आपआपल्या भागाचं प्रतिनिधित्व करतात. त्यांना हक्काचा निधी आम्ही उपलब्ध करुन देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे,” असं अजित पवार पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले.

…म्हणून वाढवला निधी

आमदार निधी दोन कोटींवरुन तीन कोटी केला आहे. त्याचं स्वागत सर्वांनीच मनापासून केलं आहे, अस पवारांनी सांगितलं. ‘आमदार निधी वाढवण्याची आमदारांची मागणी होती का?, असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना पवारांनी, “आम्ही पण आमदार आहोत. आम्हाला कळतं ना. दोन कोटी २०११ साली मी अर्थमंत्री असताना दिले होते. त्याला बराच काळ लोटला आहे. आता हा निधी तीन कोटी करण्यात आला आहे. मतदारसंघाची लोकसंख्या वाढतेय. आमदाराकडे मोठी कामं येतात. निधी मिळावा अशी अमदाराची अपेक्षा असते. आमदाराच्या हक्काचा निधी असतो तो. त्याच्यात कुठे बदल होत नाही. लोकांच्या अपेक्षा असल्याने हा निर्णय घेतला. त्याच्यामुळे महाविकासआघाडीच्या बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, उद्धवजी, एकनाथ शिंदे असतील सर्वांनीच ही भूमिका घेतली की आमदारनिधी वाढवायचाच आणि त्यापद्धतीने आम्ही तो वाढवला,” असं सांगितलं.

आधीही पवारांनीच केली होती वाढ

अजित पवार यांनी २०११ सालीही आघाडी सरकारचा अर्थसंकल्प सादर करताना आमदारांच्या स्थानिक विकास निधीत ६० लाखांची वाढ केली होती. त्यावेळी हा निधी दीड कोटी रूपयांवरून २ कोटी रूपये करण्यात आला होता.