महाविकास आघाडी सरकारचा आज पहिला अर्थसंकल्प अजित पवार विधानसभेत सादर केला. यावेळी त्यांनी शेतकरी, नोकरी व्यवसाय, शिक्षण यासारख्या क्षेत्रांसंदर्भात मोठ्या घोषणा केल्या. सामान्यांना दिलासा देणाऱ्या अनेक घोषणा पवारांनी केल्या असल्या तरी इंधनावरील कर वाढवण्याची घोषणाही यावेळी पवारांनी केली.

“शेतकऱ्यांच्या तसेच शहरांच्या दृष्टीने महत्वाची अशी अनेक पर्यावरण पुरक कामे हाती घेतली जाणार आहेत. वातावरण बदल हा भविष्यातील खूप मोठ प्रश्न असून त्यासंबंधित काम करण्यासाठी शासनाला निधीची आवश्यकता आहे,” असं पवारांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले. “अतिरिक्त विशेष समर्पित निधीची आवश्यकता राज्य शासनाला आहे. राज्यामध्ये वेगवेगळ्या हरित योजना राबवण्यासाठी सध्या इंधनावर असणाऱ्या करामध्ये प्रती लिटर एक रुपयाने वाढवून मुल्यवर्धित कर आकारण्याचा प्रस्ताव मांडत आहे,” असं पवारांनी स्पष्ट केलं.

यामुळे काय होणार?

इंधनाचे दर प्रती लिटर एक रुपयाने वाढवल्याने राज्य सरकारला १८०० कोटी इतका अतिरिक्त महसूल मिळेल अशी अपेक्षा पवारांनी व्यक्त केली आहे. “इंधनावरील मुल्यवर्धित कर वाढवल्याने शासनास सुमारे १८०० कोटी इतका अतिरिक्त महसूल मिळणे अपेक्षित आहे. हा निधी वातावरण बदलासंदर्भातील वेगवेगळ्या योजना राबवण्यासाठी वापरला जाणार आहे. हरित निधी पर्यावरण संवर्धन व जतनाचे मलनिस्सारण आणि घनकचरा व्यवस्थापन असे कार्यक्रम हाती घेणार आहे,” असं पवारांनी अर्थसंकल्प मांडता स्पष्ट केलं.