Maharashtra Budget 2020 : महाविकास आघाडी सरकारचा आज पहिला अर्थसंकल्प सादर केला. राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात केली. हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेतील ओळींनी त्यांनी पहिल्या टप्प्याची सुरूवात केली. ठाकरे सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प असून यात क्रीडा विभागासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

Maharashtra Budget 2020 Live : जाणून घ्या संपूर्ण अर्थसंकल्प

महाराष्ट्र हे प्रतिभावंत क्रीडापटू घडवणारा राज्य आहे. प्रत्येक वर्षी महाराष्ट्रातील अनेक क्रीडापटू आपले कौशल्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सिद्ध करतात. तसेच राज्याचे नाव जागतिक पटलावर उंचावतात. त्यामुळे क्रीडा विभागाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वपूर्ण असे निर्णय घेतले गेले आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्हा क्रीडा संकुलासाठी रूपये २५ कोटी इतका निधी देण्यात येणार आहे. हा निधी यापूर्वी केवळ ८ कोटींचा होता. त्यात वाढ करण्यात आली आहे.

आणखी वाचा- Maharashtra Budget 2020 : नाट्यसंमेलनासाठी सरकारची मोठी तरतूद

महत्त्वाचे म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचे शहर मानले जाणाऱ्या पुण्याच्या बालेवाडीत आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी अर्थसंकल्पात केली. तसेच, महाराष्ट्राच्या मातीतल्या कबड्डी, कुस्ती आणि खो-खो या क्रीडाप्रकारांच्या स्पर्धांच्या आयोजनासाठी ७५ लाख रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. याशिवाय, व्हॉलिबॉल स्पर्धांच्या आयोजनासाठी देखील ७५ लाखांचा निधी देण्यात येणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली. यासह पुण्यात ऑलिम्पिक भवन बनवण्याचीही त्यांनी घोषणा केली.