कौशल्य विकास विद्यापीठामार्फत रोजगाराला चालना देण्याचा संकल्प

मुंबई : वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी तसेच फसव्या विज्ञानाचा प्रसार रोखण्याकरिताच राज्यात सहा ठिकाणी राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान पार्कची उभारणी करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी केली. त्यासाठी प्रत्येकी ५० कोटी रुपयांप्रमाणे ३०० कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे.

शिकाऊ उमेदवारांना विद्यावेतनाच्या ७५ टक्के किंवा पाच हजार रुपयांपर्यंतची रक्कम राज्य शासन देणार असून योजनेचा लाभ दोन लाख उमेदवारांना मिळणे अपेक्षित आहे. ही योजना १५ ऑगस्टला २० ला सुरू होणार होती, पण करोनामुळे ती न झाल्याने आता १ मे पासून सुरू होईल.

राज्यात शासकीय कौशल्य विकास विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यात रोजगारनिर्मिती प्रशिक्षण दिले जाईल व रोजगारनिर्मितीला चालना मिळेल. आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा राज्य सरकारने केली असून त्यात २०० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. क्रीडा विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, प्रशिक्षण असे चार अभ्यासक्रम त्यात शिकविले जाणार आहेत. उच्च व तंत्रशिक्षण विभागाला कार्यक्रम व उपक्रम राबविण्यासाठी एक हजार ३९१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

बारावीपर्यंतच्या शालेय शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी अध्ययन, अध्यापन व अन्य बाबींसाठी जागतिक बँकेच्या सहकार्याने ९७६ कोटी ३९ लाख रुपयांचा स्टार्स प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राजमाता जिजाऊ शैक्षणिक गुणवत्ता विकास अभियानांतर्गत शासन व जिल्हा परिषदांच्या जीर्णावस्थेतील शाळांच्या इमारतींची पुनर्बाधणी व दुरुस्ती करण्यात येते. त्यासाठी तीन हजार कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून २०२१-२२ मध्ये त्यासाठी आवश्यक तरतूद करण्यात येणार आहे. देशातील पहिल्या सैनिकी शाळेची उभारणी १९६१ मध्ये सातारा येथे करण्यात आली होती. या शाळेसाठी पुढील तीन वर्षांत ३०० कोटी रुपये निधी दिला जाणार असून यंदासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाला विविध कार्यक्रम राबविण्यासाठी दोन हजार ४६१ कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे.

फसव्या विज्ञानाचा प्रसार रोखण्यासाठी तंत्रज्ञान पार्कची उभारणी

फसव्या विज्ञानाचा प्रसार होत असल्याने अभिजात विज्ञानाचा दृष्टिकोन मुलांमध्ये तयार होण्यासाठी प्रत्येक महसुली विभागात एक याप्रमाणे राज्यात सहा राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान पार्कची स्थापना केली जाणार आहे. सध्या फसव्या विज्ञानाचा प्रसार मोठय़ा प्रमाणावर होत असल्यानेच हा निर्णय घेण्यात आल्याचेही अजित पवार यांनी स्पष्ट के ले.

आंबा खाऊन मुलगा होणारे फसवे विज्ञान!

फसवे विज्ञान म्हणजे नक्की काय, असा प्रश्न पत्रकार परिषदेत अजित पवार यांना विचारण्यात आला असता त्यांनी, आंबा खाऊन मुलगा होतो, असा काही जण दावा करतात हे फसवे विज्ञान, असे उत्तर त्यांनी दिले. संभाजी भिडे यांनी हा दावा केला होता.