राज्यात पुन्हा दुष्काळ पडणार नाही याची खात्री सरकार देणार असेल तर आम्हीदेखील कर्जमाफी झाल्यावर शेतकरी आत्महत्या होणार नाही याची हमी द्यायला तयार आहोत असे सडेतोड प्रत्युत्तर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारला दिले आहे.

गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीच्या मागणीवर विधानसभेत उत्तर दिले होते. २००९ मध्ये राज्य सरकारने कर्जमाफी केली. पण कर्जमाफी केल्यानंतरच्या पाच वर्षात १६ हजार आत्महत्या झाल्या. त्यामुळे आता पुन्हा कर्जमाफी केल्यावर शेतकरी आत्महत्या करणार नाही याची हमी विरोधक देणार का असा प्रश्नच मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना विचारला होता. मुख्यमंत्र्यांच्या या विधानाचा शुक्रवारी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी समाचार घेतला. मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिलेले उत्तर दिशाभूल करणारे आहे. सरकार जर पुन्हा दुष्काळ पडणार नाही याची हमी देणार असेल तर विरोधकही शेतकरी पुन्हा आत्महत्या करणार नाही याची हमी द्यायला तयार आहेत असे आव्हानच त्यांनी दिले.

विधीमंडळातील प्रत्येक आमदाराची नाळ शेतीशी जोडलेली आहे. मुख्यमंत्री विरोधी पक्षांना प्रश्न विचारतात. पण विद्यमान सरकारने शेतमालाला हमी भाव ५० टक्क्यांनी वाढवून दिला शेतकऱ्यांनी आत्महत्या केली नसती असेही त्यांनी म्हटले आहे. देशाचे कृषीमंत्री म्हणतात की कर्जमाफी फक्त उत्तरप्रदेशमधील शेतकऱ्यांनाच देऊ. उत्तरप्रदेशमधील मतदारांनी मतदान केले म्हणून तेथील शेतकरी हे शेतकरी ठरतात. पण अडीच वर्षांपूर्वी मतदान करणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांना भाजपने वाऱ्यावर सोडले असा आरोप त्यांनी केला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीवरुन नवव्या दिवशीही विरोधक आक्रमक होते. दुपारपर्यंत दोन वेळा सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले.