News Flash

“बारामती आणि पुण्याच्या आजुबाजूला….,” विधानभवनात फडणवीसांसमोरच घोषणाबाजी

विधानभवनात देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर विधानसभा विरोधी पक्षनेते यांनी यावरुन राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. याला राज्याचा अर्थसंकल्प म्हणायचं की काही विशिष्ट भागाचा म्हणायचं असा प्रश्न निर्माण झाला असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. अर्थसंकल्पातून निराशा झाल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. विधानभवनात देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

दरम्यान फडणवीस पत्रकारांशी संवाध साधणार याआधी त्यांच्यासोबत उपस्थित आमदारांकडून घोषणाबाजी करण्यात आली. ‘शेतकऱ्यांवर आणि विदर्भावर अन्याय करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो’, ‘शेतकरीविरोधी सरकारचा धिक्कार असो’, ‘मराठवाडा, विदर्भाला विकास मंडळं न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. घोषणा सुरु असल्याने फडणवीस बोलण्यासाठी थांबले होते. याचवेळी बारामती आणि पुण्याच्या आजुबाजूला अर्थसंकल्प सादर करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा निषेध अशी घोषणा करण्यात आली.

फडणवीस काय म्हणाले –
“राज्याचा अर्थसंकल्प म्हणायचा की विशिष्ट भागाचा अर्थसंकल्प हा प्रश्न आहे. या अर्थसंकल्पाने संपूर्णपणे निराशा केली आहे. प्रामाणिक शेतकऱ्यांना काहीही मिळालेलं नाही. मूळ कर्जमाफीच्या योजनेत ४५ टक्के शेतकरी वंचित राहिले असून त्यांना एका नव्या पैशाची मदत झालेली नाही. शेतकऱ्यांना धान्यासाठी, विज बिलासाठी कुठल्याही प्रकारे सवलत दिलेली नाही. तीन लाखांपर्यंत शून्य टक्के व्याज ही फसवी बाब आहे. महाराष्ट्रात ८० टक्के शेतकऱ्यांची कर्ज घेण्याची मर्यादाच ५० हजार आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार नाही,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

पुण्याला अर्थसंकल्पातून काय मिळालं?; वाचा महत्त्वाच्या घोषणा
हे महाराष्ट्राचं बजेट की मुंबई महापालिकेचं बजेट?; फडणवीसांची ठाकरे सरकारला विचारणा

“पायाभूत सुविधा एकतर सुरू असलेले प्रकल्प आहेत, किंवा केंद्र सरकारच्या योजना आहेत. रस्ते, सिंचन, रेल्वे, कुठलंही क्षेत्र घ्या.. कुठल्याही योजना बघा केंद्र सरकारच्या योजना आहेत. त्यांनी जाहीर केल्या ठीक आहे, पण हे सांगायला सरकार विसरलं,” अशी टीका यावेळी त्यांनी केली.

हे महाराष्ट्राचं बजेट की मुंबई महापालिकेचं बजेट?
“ज्या मुंबई महापालिकेच्या योजना महाराष्ट्राच्या बजेटमध्ये घोषित केल्या आहेत त्या सुरू असलेल्या योजना आहेत. काही योजना तर आमच्या सरकारच्या काळात सुरू झालेले प्रकल्प आहेत. त्यामुळे पायाभूत सुविधांचा एकही प्रकल्प राज्य सरकारनं केलेला नाही. प्राचीन मंदिरांच्या संदर्भातल्या घोषणा या सुरू असलेल्या व आधीच्या सरकारनं केलेल्या कामांच्याच योजना आहेत. नवीन काही नाही,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

केंद्राला इंधन दरावर बोलण्याचा अधिकारच राहिला नाही-
“रोज पेट्रोल-डिझेलचे बोर्ड घेऊन येणारे सत्तापक्षाचे आमदार यांच्या नाकावर टिच्चून राज्य सरकारने २७ रुपयांपैकी एक नवा पैसाही पेट्रोल-डिझेलवर कमी केलेला नाही. त्यामुळे आता राज्य सरकारला पेट्रोल-डिझेलच्या भावावर बोलण्याचा अधिकार नाही. कारण गुजरातपेक्षा महाराष्ट्रात पेट्रोल १० रुपये महाग आहे कारण राज्य सरकारचा कर जास्त आहे,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

पुण्यासाठी झालेल्या घोषणा-
१) पुणे, नगर, नाशिक जलद रेल्वेला मंजुरीः पुणे-अहमदनगर-नाशिक या शहरांदरम्यान जलद रेल्वेला मंजूरी देण्यात आली आहे. २३५ किमी लांबीचा रेल्वे मार्ग उभारण्यात येणार असून, या रेल्वे मार्गासाठी १६ हजार १३९ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.

२) पुण्यात आठ पदरी रिंग रोडची उभारणी : पुण्यातील वाहतुकीसंदर्भात महत्त्वाची घोषणा आज करण्यात आली आहे. पुण्याबाहेरुन रिंग रोडची उभारणी काळाची गरज आहे, असं सांगत त्यासाठी १७० किमी लांबीच्या २६ हजार कोटींच्या आठ पदरी रिंग रोडचे काम करण्यात येणार आहे. यासाठी भूसंपादनाचं काम याच वर्षी हाती घेण्यात येईल. या रिंग रोडमुळे पुण्यातील ट्रॅफिकची समस्या सुटू शकते, असं अजित पवार यांनी नमूद केलं.

३) ससूनसाठी २८ कोटी २२ लाख : अर्थसंकल्पात राज्यातील ७ जिल्ह्यांमध्ये नव्या वैद्यकीय महाविद्यालयांची स्थापना करण्याची घोषणा अजित पवार यांनी केली. सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, नाशिक, रायगड, सातारा, अमरावती आणि परभणी येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पुण्यातील ससून रुग्णालयात कार्यरत वर्ग ४ मधील कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाच्या बांधकामासाठी २८ कोटी २२ लाख रुपयांच्या खर्चाला मान्यता दिल्याची घोषणा पवार यांनी केली.

४) मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर साडेदहा किलोमीटर लांबीच्या दोन भुयारी मार्गांचा तसेच २ किलोमीटर लांबीच्या २ पुलांचा समावेश असलेल्या ६ हजार ६९५ कोटी रुपये किमतीच्या प्रकल्पांचे बांधकाम सुरु असून, ते डिसेंबर २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याची माहिती अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना सांगितले.

५) पुणे शहरात आणखी एक विमानतळ उभारण्यात येणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली.

६) देशातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ राज्यात स्थापन करण्यात आले असून, त्याची घोषणा अजित पवार यांनी केली. सध्या पुणे जिल्ह्यात बालेवाडी येथए क्रीडा संकुल सुरू आहे. या क्रीडा संकुलात विविध प्रकारच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 8, 2021 5:56 pm

Web Title: maharashtra budget session bjp leaders slogans before devendra fadanvis sgy 87
Next Stories
1 मराठा आरक्षण : मोदी सरकारने महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला – सचिन सावंत
2 …अन् जाता जाता उद्धव ठाकरेंनी लगावला फडणवीसांना टोला
3 Video: कोल्हापूरमध्ये दिसली मगर; नागरिकांची चिंता वाढली
Just Now!
X