मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणावरुन सध्या विरोधकांच्या निशाण्यावर असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची बदली होणार आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत ही घोषणा केली आहे. कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर निवेदन देण्यासाठी अनिल देशमुख विधानपरिषदेत उपस्थित होते. यावेळी त्यांनी सचिन वाझे यांची क्राइम ब्रांचमधून बदली करुन इतर ठिकाणी नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती दिली. विरोधक मात्र अटकेच्या मागणीवर ठाम असून यावेळी सभागृहात झालेल्या गदारोळानंतर कारवाई स्थगित करण्यात आली.

“कोण लागून गेला सचिन वाझे?,” विधानपरिषदेत प्रवीण दरेकर संतापले

अनिल देशमुख यांनी निवदेनाच्या सुरुवातीला राज्यातील गुन्हेगारीची आकडेवारी दिली. मात्र यावरुन विरोधकांनी गदारोळ घालत सचिन वाझेंवर काय कारवाई करणार आहे अशी विचारणा करत त्यावर बोलण्याची मागणी केली. अनिल देशमुख यांनी यावेळी सांगितलं की, “सचिन वाझेंवर नियमानुसार कारवाई होईल. सध्या क्राइम ब्रांच जिथे ते कामाला आहेत तिथून हलवून दुसऱ्या ठिकाणी नियुक्ती करण्यात येईल”. निष्पक्षपणे चौकशी करुन जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असंही यावेळी त्यांनी सांगितलं.

अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंची बदली होणार असल्याची घोषणा केल्यानंतरही विरोधकांचा गदारोळ कायम होता. बदली नाही तर निलंबन करुन अटक करा अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे.

आणखी वाचा- दाऊद, शिवसेना ते अँटिलिया! नक्की कोण आहेत सचिन वाझे?

“कोण लागून गेला सचिन वाझे?,” प्रवीण दरेकर संतापले
“सचिन वाझे प्रकरणावरुन वातावरण अत्यंत संतप्त आहे. मनसुख हिरेन यांच्या पत्नीने सचिन वाझेंनी पतीचा खून केल्याचा संशय व्यक्त केल आहे. प्रथमदर्शनी अनेक पुरावे समोर येत आहेत. विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी पत्नीचा जबाब सांगितला तरी सरकार सचिन वाझेंना पाठिशी घालण्याचा प्रयत्न करत आहे,” असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला.

“पूजा चव्हाण प्रकरणात २० दिवस एफआयआर दाखल झाला नाही. लॅपटॉपवरील पुरावे गायब झाले, अरुण राठोड गायब आहे, रुग्णलयात गर्भपात करणारी पूजा अरुण राठोड कोण हे अजून समोर आलेलं नाही,” असा उल्लेख करत प्रवीण दरेकर यांनी कायदा-सुव्यस्थेवरुन सरकारवर निशाणा साधला.

आणखी वाचा- अंबानी प्रकरण: ‘ती’ गाडी काल संध्याकाळपर्यंत मुंबईतच होती; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

“मनसुख हिरेन प्रकरणात ज्या गोष्टी उपलब्ध आहेत त्या नष्ट करण्यासाठी सरकार संधी देत आहे. राज्यातील जनतेचा सरकावर विश्वास राहिलेला नाही. कोण लागून गेला सचिन वाझे? तुमचा जावईल आहे का सभापती महोदय? का हे सरकार पाठीशी घालत आहे?,” असे संतप्त सवाल प्रवीण दरेकर यांनी विचारले. पुरावे नष्ट करण्यासाठी वेळ दिला जात आहे असा आरोप करताना सचिन वाझेंना अटक करण्याची मागणी प्रवीण दरेकर यांनी केली.