राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर आज खातेवाटप जाहीर झाले आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वरचष्मा असल्याचे दिसतेय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना-कॉंग्रेस व राष्ट्रवादी या तीन पक्षांच्या महाविकास आघाडी सरकारने विदर्भाकडे विशेष लक्ष दिले असून सर्वाधिक सात कॅबिनेट मंत्रीपदे व एक राज्यमंत्रीपद विदर्भाच्या वाट्याला आले आहे. तर, प्रभावशाली मानल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्राकडे पाच कॅबिनेट व पाच राज्यमंत्रीपदे अशी सर्वाधिक मंत्रिपदे गेली आहेत. त्याखालोखाल उत्तर महाराष्ट्राला सहा कॅबिनेट मंत्रिपदे व एक राज्यमंत्रीपद असे सात मंत्री मिळाले आहेत. मराठवाडय़ाला पाच कॅबिनेट तर दोन राज्यमंत्रीपदे सात मिळाली. कोकणाला तीन कॅबिनेट व एक राज्यमंत्रीपद मिळाले आहे.
महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांसह ४३ मंत्र्यांचा समावेश आहे. यामध्ये ३२ कॅबिनेट मंत्री आणि १० राज्यमंत्र्यांचा सहभाग आहे. ४३ मंत्रिपदं असतानाही राज्यातील ३६ जिल्ह्यापैकी १३ जिल्ह्यांना एकही मंत्रिपद मिळालं नाही. राज्यात इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्री (सुशीलकुमार शिंदे) आणि उपमुख्यमंत्री (विजयसिंह मोहिते पाटील) पद भुषविणारा सोलापूर जिल्हा होता. मात्र हाच जिल्हा यंदाच्या मंत्रिमंडळात मंत्रिपदापासून वंचित राहिलेला पाहायला मिळतोय.
या १३ जिल्ह्यात नाही एकही मंत्रिपद –
पालघर
सोलापूर
उस्मानाबाद
अकोला
भंडारा
गोंदिया
वर्धा
परभणी
हिंगोली
वाशिम
गडचिरोली
धुळे
सिंधुदुर्ग
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 5, 2020 3:05 pm