|| सौरभ कुलश्रेष्ठ

राज्य मंत्रिमंडळाच्या बहुप्रतीक्षित विस्तारात भाजपमधील निष्ठावंत आणि वर्षांनुवर्षे पक्षाची पाठराखण करणाऱ्या ओबीसी समाजातील नेत्यांना झुकते माप देताना राजकीयदृष्टय़ा प्रभावशाली अशा मराठा समाजातील चार नेत्यांना संधी देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रादेशिक समतोलाबरोबरच विधानसभा निवडणुकांच्या आधी सामाजिक संतुलन यशस्वीरीत्या पार पाडले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर इतर पक्षांतील नेत्यांना मोठय़ा प्रमाणात भाजपमध्ये घेण्यात आले. इतकेच नव्हे तर त्यांना विधान परिषदेची आमदारकी, महामंडळे अशी सत्तास्थानेही मिळाली. त्यामुळे निष्ठावंतांची उपेक्षा होत असल्याचा सूर पक्ष संघटनेत होता. त्याचबरोबर गेल्या काही वर्षांत मराठा समाजातील नेत्यांना महत्त्व देऊन भाजपचा व शिवसेनेचाही प्रमुख राजकीय आधारस्तंभ असलेल्या ओबीसी समाजाकडे दुर्लक्ष होत असल्याची कुजबूजही वाढली होती.

विस्तारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाणाक्षपणे या दोन्ही मुद्दय़ांबाबतची नाराजी दूर केली. विस्तारात १३ नव्या मंत्र्यांपैकी भाजपचे १० मंत्री असून शिवसेनेचे दोन व रिपाइंला एक मंत्रिपद मिळाले. भाजपच्या दहापैकी राधाकृष्ण विखे-पाटील हे एकमेव आयाराम असून अनिल बोंडे हे पाच वर्षांपूर्वीच पक्षात आले होते.

भाजपचे संजय कुटे, संजय भेगडे, आशीष शेलार, सुरेश खाडे, अतुल सावे, योगेश सागर आदी इतर आठ नूतन मंत्री हे पक्षाचे जुने निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. त्यातून पक्ष संघटनेसाठी कष्ट उपसलेल्यांना आजही भाजपमध्ये मान असल्याचा व निष्ठावंतांना झुकते माप दिल्याचा संदेश फडणवीस यांनी दिला आहे. या विस्तारात ओबीसींना झुकते माप मिळाले असून १३ पैकी पाच मंत्री युतीच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या ओबीसी समाजातील आहेत.

विदर्भात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कुणबी समाजाला डॉ. संजय कुटे, डॉ. अनिल बोंडे व परिणय फुके यांच्या रूपाने संधी देण्यात आली आहे. तर अतुल सावे यांच्या रूपाने माळी समाजाला प्रतिनिधित्व देण्यात आले आहे.  शिवसेनेचे जयदत्त क्षीरसागर हे तेली समाजातील मोठे नेते आहेत. मराठा समाजातील राधाकृष्ण विखे-पाटील, आशीष शेलार, संजय भेगडे आणि शिवसेनेचे तानाजी सावंत अशा एकूण चार जणांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळाले.

सुरेश खाडे यांच्या रूपाने पश्चिम महाराष्ट्रातील अनुसूचित जातीमधील नेत्याला संधी देण्यात आली आहे. तर अशोक उइके यांच्या रूपाने आदिवासी समाजाला स्थान देण्यात आले आहे. आतापर्यंत सर्वसाधारणपणे आदिवासी विकासमंत्री हा उत्तर महाराष्ट्र, ठाणे, अहमदनगर या परिसरातूनच येत असे. फडणवीस यांनी विदर्भातील यवतमाळच्या उइके यांना आदिवासी विकासमंत्री करत विदर्भातील आदिवासींना न्याय दिल्याचा संदेश दिला आहे.

मुंबईतील प्रकाश महेता यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिल्यानंतर योगेश सागर यांच्या रूपाने मुंबई महानगर प्रदेशात मोठय़ा संख्येत असलेल्या गुजराती समाजाला प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. तर रिपाइंने अविनाश महातेकर यांना संधी दिल्याने नवबौद्ध समाजालाही संधी मिळाली आहे.

प्रादेशिक संतुलनाचा विचार करता विदर्भाला या १३ नव्या मंत्र्यांपैकी कुटे, बोंडे, उइके व फुके यांच्या रूपाने सर्वाधिक चार जागा मिळाल्या. तर जयदत्त क्षीरसागर व अतुल सावे हे दोघे मराठवाडय़ातील आहेत. सुरेश खाडे, संजय भेगडे, तानाजी सावंत हे तिघे पश्चिम महाराष्ट्रातील आहेत. आशीष शेलार, योगेश सागर, अविनाश महातेकर हे तिन्ही मुंबईतील आहेत. तर राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या रूपाने उत्तर महाराष्ट्राला संधी मिळाली आहे.