गेल्या अनेक महिन्यांपासून राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या चर्चा सुरू होत्या. परंतु मंत्रिमंडळाच्या विस्ताराला मात्र मुहूर्त मिळाला नव्हता. त्यातच शुक्रवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी उद्धव ठाकरे यांची त्यांच्या मातोश्री या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत सविस्तर चर्चा करण्यात आल्याची माहिती खुद्द मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवरून दिली. त्यामुळे आता मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या चर्चांना पूर्णविराम लागण्याच्या शक्यता आहेत.

मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ विस्तार केव्हा होईल याबाबत माहिती दिली नसली तरी 16 जून रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यापूर्वी नवनियुक्त केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली होती. तसेच राज्यातील संभाव्य मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलासंदर्भात शहा यांच्याशी चर्चा केल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीदेखील राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे सांगितले होते. 14 जून रोजी हा विस्तार होईल अशा शक्यता वर्तवण्यात आल्या होत्या. परंतु 14 जूनचा मुहूर्त टळला. आता 16 जून रोजी हा विस्तार होईल, अशा शक्यता वर्तवण्यात येत आहेत.