मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा टोला

राज्यात आभासी सरकार असल्याच्या विरोधकांच्या टीकेचा खरपूस समाचार घेताना खरे तर विरोधकच आभासातून बाहेर आले नाहीत व त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत त्यांचा लाजिरवाणा पराभव झाल्याचा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. त्याचबरोबर विरोधी पक्षातील नेत्यांचा त्यांच्या नेतृत्वावर विश्वास राहिला नाही व त्यामुळेच ते आमच्याकडे येत आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सुनावले.

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत असून त्या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी रविवारी दुपारी सह्य़ाद्री अतिथीगृहावर पत्रकारांशी संवाद साधला. विरोधक हे आभासातून बाहेर पडलेले नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारवरही त्यांनी असेच आरोप केले. आभासात रमलेल्या विरोधकांचे जमिनीशी व सर्वसामान्यांशी नाते तुटल्यानेच वास्तव परिस्थिती काय आहे हे त्यांना समजलेच नाही. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत लाजिरवाणा पराभव त्यांना पत्करावा लागला, असा टोला मुख्यमंत्री फडणवीस यांनी लगावला.

फडणवीस हे विरोधी नेत्यांना फोडण्याचे राजकारण करत असल्याची टीका केल्याबाबत विचारले असता, तुमचे लोक तुमच्याबरोबर राहायला का तयार नाहीत याचे आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला  मुख्यमंत्र्यांनी दिला. विरोधी पक्षातील लोकांचा आता त्यांच्या नेतृत्वावर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळेच ही नेतेमंडळी आमच्याकडे येत असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले.

दुष्काळावर प्राधान्याने चर्चा

विधिमंडळाच्या या अधिवेशनात राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर प्राधान्याने चर्चा होईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारने केलेल्या उपाययोजनांची चर्चा होईल. आतापर्यंत राज्य सरकारने ४७०० कोटी रुपयांची रक्कम दुष्काळग्रस्तांसाठी उपलब्ध करून दिली आहे. पीक विम्यापोटी ३३०० कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचा लाभ एक कोटी २० लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्याचे काम सुरू आहे. विरोधकांनी उपस्थित केलेल्या कोणत्याही मुद्दय़ावर चर्चा करायची राज्य सरकारची तयारी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. अधिवेशनात १३ नवीन विधेयके मांडली जातील व आधीच्या १५ प्रलंबित विधेयकांवरही चर्चा होईल, असे फडणवीस यांनी सांगितले.