नवं वर्ष लागण्यापूर्वी म्हणजेच १ जानेवारी २०२० पूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होईल असं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच शेतकऱ्यांबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. सिंचन घोटाळ्याबाबत जी क्लीन चिट मिळाली त्याबाबत नो कॉमेंट एवढीच प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अजित पवार आमचे उपमुख्यमंत्री असतील असं वक्तव्य केलं होतं त्यावर विचारलं असता, “कुणाला कोणती जबाबदारी द्यायची याचा निर्णय शरद पवार घेतील. शरद पवार जो काही निर्णय घेतील तो मला मान्य असेल. संजय राऊत काय म्हणाले ते मी वाचलेलं नाही.” असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

अजित पवार यांना क्लीन चिट मिळाली त्यानंतर संजय राऊत यांना विचारलं असता ही आनंदाची बाब आहे. अजित पवार हे आमचे होणारे उपमुख्यमंत्री आहेत असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं. त्यावर अजित पवार यांना विचारलं असता मला याबाबत माहित नाही मी वाचलं नाही असं उत्तर दिलं आहे. तसंच आज शेतकऱ्यांबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

CAA आणि NRC वरुन होणाऱ्या आंदोलनाबाबत विचारलं असता, लोकशाहीमध्ये शांततेच्या पद्धतीने आंदोलन केलं जावं तो प्रत्येकाचा अधिकार आहे. मात्र या सगळ्या गोष्टींना हिंसेचं वळण लावू नका असंही आवाहन अजित पवार यांनी केलं आहे.