रामदेवबाबा यांनी जगात भारताचे नाव उंचावले. ते तर राष्ट्रपुरुष आहेत, असे विधान राज्याचे संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी विधान परिषदेत केले. या विधानावरुन विधान परिषदेत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी गदारोळ केला. व्यापारी बाबाची देशाच्या खऱ्याखुऱ्या राष्ट्रपुरुषांशी तुलना करणाऱ्या संसदीय कार्यमंत्र्यांनी माफी मागावी, अशी मागणी विरोधकांनी केली आहे.

विधान परिषदेत गुरुवारी काँग्रेसचे आमदार संजय दत्त यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे सरकार रामदेवबाबांना एवढे महत्त्व का देते, असा प्रश्न उपस्थित केला. राज्य सरकारच्या आपले सरकार या वेबपोर्टलवर पतंजली कंपनीची उत्पादने का विकली जात आहे, सरकारी संकेतस्थळावर खासगी कंपनीला स्थान का, अन्य कंपन्यांना अशी सुविधा का नाही, असा प्रश्न त्यांनी विचारला. तसेच ‘मिहान’मध्ये रामदेवबाबा यांच्या कंपनीला कवडीमोल किंमतीत जागा देण्यात आली, असा आरोपही त्यांनी केला.

संजय दत्त यांच्या आरोपांवर उत्तर देण्यासाठी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री व संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट उभे राहिले. रामदेवबाबा यांनी योग क्षेत्रात देशाचे नाव उंचावले. रामदेवबाबा राष्ट्रपुरुष आहेत. योग आणि स्वदेशी उत्पादनात क्रांती घडवणाऱ्या रामदेवबाबांविषयी विरोधी पक्षाच्या आमदारांनी अशी टीका करणे योग्य नाही, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या या विधानावरुन विरोधी पक्षातील आमदार आक्रमक झाले.

व्यापारी बाबाची देशाच्या खऱ्याखुऱ्या राष्ट्रपुरुषांशी तुलना करणाऱ्या संसदीय कार्यमंत्र्यांनी माफी मागावी, अशी मागणी आमदारांनी केली. यानंतर आमदारांनी घोषणाबाजी सुरु केली. बापट यांच्या बचावासाठी सत्ताधारी बाकांवरील आमदारही पुढे आले. शेवटी गदारोळ थांबत नसल्याने विधान परिषदेचे कामकाज ४० मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.

पावसाळी अधिवेशन नागपूरला?
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन चार जुलै रोजी सुरू होणार असून ते नागपूरला घेण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. ते अधिवेशन नागपुरात होणार की मुंबईत याचा अंतिम निर्णय घेण्यासाठी तीन मंत्र्यांची समिती नेमण्यात आली आहे. हिवाळी अधिवेशन नागपूरला होत असते. ती परंपरा तोडून पावसाळी अधिवेशन नागपूरला घेण्याचा राज्य सरकारचा विचार सुरू होता. त्यानुसार मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुरुवारी रात्री विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन नागपूरला घ्यायचे की मुंबईला याचा विचार करण्यासाठी तीन मंत्र्यांची समिती नेमण्याचा निर्णय झाला, असे संसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट यांनी जाहीर केले. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांचे कामकाज खूप असते. त्यानंतर मार्चला केवळ तीनच महिने उरतात. हिवाळी अधिवेशन नागपूरला असल्याने सगळी कागदपत्रे नागपूरला हलवून परत आणावी लागतात. या सर्व प्रक्रियेत वेळ जातो. त्याचबरोबर या सर्व कामकाजामुळे विदर्भातील प्रश्नांना कमी वेळ मिळतो. त्यामुळे पावसाळी अधिवेशन नागपूरला घेण्याचा विचार असल्याचे बापट यांनी स्पष्ट केले.